कोरोनाकाळात नेरी व परिसरात शेतकऱ्याची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:35+5:302021-07-10T04:20:35+5:30
पळसगाव (पि) : खरीप हंगामाला जोमात सुरुवात झाली असून चांगल्या पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांची पेरणी करून शेतीच्या हंगामाला वेग आला ...
पळसगाव (पि) : खरीप हंगामाला जोमात सुरुवात झाली असून चांगल्या पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांची पेरणी करून शेतीच्या हंगामाला वेग आला आहे. आता या पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची व इतर रासायनिक खतांची आवश्यकता आहे. परंतु कृषी केंद्राच्या नफेखोरी वृत्तीमुळे युरिया व इतर खतांचा साठा नसल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात ज्यादा दराने विक्री सुरू आहे. प्रशासनिक पातळीवर खताचा योग्य साठा असूनही नेरी व परिसरात कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे.
सध्या शेतकऱ्यांचे कोरोनाने कंबरडे मोडलेले आहे. त्यातच कृषी केंद्राचालक हे अवाजवी दराने खतांची विक्री केली जात आहे. युरिया ३०० ते ३५० रु., २०.२०.०.१३ दीड ते दोन हजार रु., चिल्लर दरात युरिया १० ते १५ रु. किलो व इतर खते २० ते २५ रु. किलो दराने विक्री केली जात असतानाही प्रशासनातील अधिकारी हे मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसते. अशा अवाजवी दरावर खतांची विक्री करणाऱ्या या कृषी केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
यासंबंधात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता सहारे पंचायत समिती चिमूर यांच्याशी बोला असे सांगण्यात आले; मात्र अशा अवाजवी दराने खत विक्री करणाऱ्यांवा कारवाईसंदर्भात कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.