शासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
By admin | Published: January 3, 2015 10:59 PM2015-01-03T22:59:47+5:302015-01-03T22:59:47+5:30
बल्लारपूर तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसून ते जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणाहून
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसून ते जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत आहेत. परिणामी जनतेची कामे खोळंबत आहेत. जनतेला कामासाठी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. एवढेच नव्हे तर त्यांच्या शोधासाठी आर्थिक खर्च व पायपीट करावी लागत आहे. शासनाच्या अटी व शर्थींचा भंग करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याची मागणी जनतेकडून होत असतानाही वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत.
राज्यात भाजपाचे सरकार असून बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी केली जात आहे.
आपल्या सोयीनुसार कार्य करणाऱ्या बेताल कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा घोषणा करणाऱ्या जनप्रतिनिधींकडूनच त्यांची पाठराखण केल्या जात असल्याचा समज जनतेत पसरला आहे. शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहून जनतेची कामे अग्रक्रमाने पार पाडतील, असा समज आता फोल ठरत आहे.
ग्रामीण भागातील शाळेतील सर्व शिक्षक जिल्हा व तालुक्यातून ये-जा करीत आहेत. शाळेत १० वाजता येणे व पाच वाजता परत जाण्यासाठी त्यांची घाई असते. केवळ घराची प्रतिक्षा करणाऱ्या शिक्षकांकडून उत्कृष्ट ज्ञानार्जनाच्या कार्याची अपेक्षा पालक कसे करतील. मुख्यालयी राहात असल्याचे खोटे दाखले, ग्रा.पं. व शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून त्यांना चिरीमिरी देऊन मिळवितात. घरभाडे भत्ता व नक्षलभत्ता मिळवून शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचे काम शिक्षकांकडून होत आहे. हा सर्व प्रकार संवर्ग विकास अधिकाऱ्यांना माहित असून देखील त्यांचा घरभाडे भत्ता व नक्षलभत्ता कपात करण्याची हिंमत ते करीत नाहीत. शासनाच्या सेवेत रूजु होताना कर्मचारी मुख्यालयी राहून काम करण्याची अट असते. त्यानुसार त्यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अनागोंदी कारभार सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये जनतेचा व शासनाचा दूवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवकांनी तर कहर केला आहे. दुपारी १२ वाजता येतो व तीन वाजता स्वगावी परत जातो. तीन तासात गावाचा विकास आम्हीच करतो, अशी शेखी मिरविण्यातही ते कमी करीत नाही. कोणताही ग्रामसेवक मुख्यालयी राहात नाही. एवढेच नव्हे तर तो ग्रामसभेसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमातही ते अनुपस्थित असल्याचे अनेक दाखले आहेत. त्यांना गाव, गाव विकास, गावाची कामे, जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. मात्र ग्रा.पं.चा आर्थिक व्यवहार स्वत:कडे ठेवून झोळी भरण्यात ते कमी करीत नाही. गाव विकासाची धूरा ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच मुख्यालयी न राहता जिल्हास्थळावरून ये-जा करतात. आठवड्यातून एक ते दोन दिवस ग्रा.पं. मध्ये दिसतात. इतर दिवशी कार्यालयीन कामासाठी वरिष्ठांच्या आदेशाने बाहेर असल्याची बतावणी करतात.
गावातील विकासात्मक कामात ठेकेदारासोबत संगनमत करून कमिशन कमविण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाहीत. या कमिशनमध्ये वरिष्ठांचा वाटा असल्याची उघड भाषा करण्यात कमी करत नाहीत. ग्रामसेवक बाहेरून ये-जा करीत असल्याच्या अनेक तक्रारी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केल्या असताना त्यांचेवर कारवाई का करीत नाहीत. असा संतप्त सवाल जनता करीत आहे. (वार्ताहर)