नुकसान लाखोंचे, मदत मात्र हजारांत
By admin | Published: June 5, 2014 11:54 PM2014-06-05T23:54:25+5:302014-06-05T23:54:25+5:30
गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक सहामधील वस्तीत लागलेल्या आगीने अनेकांची घरे बेचिराख झालीत. अंगावरील कपड्यांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. यात ८६ झोपड्या जळाल्या. जवळपास एक करोड ८0 लाख २0 हजार रुपयांचे
जगायचे कसे? : आगग्रस्तांचे अश्रू कोण पुसणार?
रत्नाकर चटप - लखमापूर
गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक सहामधील वस्तीत लागलेल्या आगीने अनेकांची घरे बेचिराख झालीत. अंगावरील कपड्यांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. यात ८६ झोपड्या जळाल्या. जवळपास एक करोड ८0 लाख २0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शासकीय सर्वेक्षणात दिसून येते. मात्र चार दिवस लोटूनही केवळ एक हजार २00 ते एक हजार ५00 रुपयांचा धनादेश कुटुंबांना वाटप करण्यात आला. येथे राहणार्या नागरिकांचे नुकसान लाखांच्या घरात आहे. मात्र मिळणारी मदत ही हजारात असल्याने आता जगायचे कसे, रहायचे कुठे, असा प्रश्न आगग्रस्तांना सतावत आहे.
वस्तीत मजूर, शेतमजूर, कामगार, लघुउद्योग करणारे नागरिक मोठय़ा प्रमाणात राहतात. ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून टिनाचे छत आणि ताटवे बांधून आपल्या निवारा उभा केला. मात्रं आगीने सारा संसारच जळून खाक झाला. शेकडो कुटुंब बेघर झाले. अशा परिस्थितीत शासनाची घर उभारण्यापुरती तरी तात्पुरती मदत मिळेल, अशी आशा येथील आगग्रस्तांना होती. मात्र केवळ एक हजार २00 ते एक हजार ५00 रुपये आगग्रस्तांच्या हाती टेकवून त्यांची बोळवण करण्यात आली. परिणामी आगग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. उन्हाचा पारा वाढत असून राहण्यासाठी साधी झोपडी उभारतो म्हटले तरी हजारो रुपये खर्च होतो. त्यामुळे या प्रमाणात शासनाने मदत देणे अपेक्षित असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. घरातील वस्तु, धान्य आणि महत्वाची कागदपत्रे आगीत जळून राख झाली, तर दुसरीकडे अनेकांच्या घरातील पैसे आणि सोन्याचे दागिनेही स्वाहा झालेत. त्यामुळे दुसर्यापुढे हात पसरण्याची वेळ आल्याची केविलवाणी व्यथा आगग्रस्त महिलांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितली.
आगीचे वृत्त पसरल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, खासदार, आमदारांनी घटनास्थळी भेटी देऊन आगग्रस्तांचे सात्वंन केले. मात्र घरी धान्य नसल्याने व अपुर्या इंधनामुळे अद्यापही भुकेची आग कायम आहे. आगग्रस्तांना तात्काळ मदत म्हणून प्रती व्यक्ती ३0 रुपये खावटी निधी देण्याची तरतुद आहे. परंतु ३0 रुपयात एका व्यक्तीचे पोट भरेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे महागाई मोठय़ा प्रमाणात निराधार झालेल्या आगग्रस्तांना या निधीचा आधार तारणार कसा? यातील अनेक जण दारिद्र रेषेखालील असून त्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे. यासाठी विशेष तरतूद करावी, अशी लोकप्रतिनिधींकडून आगग्रस्तांची अपेक्षा आहे. लाखोंचे नुकसान झाल्यानंतर शेकडोची मदत मिळत असेल तर गरिबांनी जगायचे कसे? असाही प्रश्न आगग्रस्त उपस्थित करीत आहेत. आगग्रस्तांना निदान निवारा उभा करण्यापुरती तरी आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.