यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:49+5:302021-06-10T04:19:49+5:30

बाॅक्स जिल्ह्यातील एकूण नद्या -२ जिल्ह्यातील नदीशेजारील गावे- ६५ जिल्ह्यातील पूरबाधित तालुके -५ चंद्रपूर : यावर्षी पाऊस चांगला पडणार ...

A lot of rain this year; The district is now in danger of flooding after Corona | यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती

Next

बाॅक्स

जिल्ह्यातील एकूण नद्या -२

जिल्ह्यातील नदीशेजारील गावे- ६५

जिल्ह्यातील पूरबाधित तालुके -५

चंद्रपूर : यावर्षी पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वतयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बैठक तसेच विभागनिहाय सूचना जारी केल्या असून, विभाग संभाव्य पूरपरिस्थितीसोबत लढण्यास सज्ज आहे.

जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदीकाठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, संभाव्य पूरपरिस्थितीच्या गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पूर आल्यास कोणत्या उपाययोजना करावयाच्या यासंदर्भात आराखडाही तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, त्यातील पोट कलम-२ नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. यानुसार त्यांनी सर्वसंबंधित अधिकारी तसेच विभागप्रमुखांना मान्सूनपूर्व तयारीची सर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुकास्तरावर तसेच महापालिका, नगरपरिषदांनाही यासंदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पूरबाधित गावांमध्ये आपत्तीत नागरिकांनी काय करावे, काय करू नये याबाबतही जनजागृती करण्यात येत आहेत.

चंद्रपूर शहरातील काही भाग पूरबाधित आहे. इरई नदीला पूर आल्यास या भागातील नागरिकांना धोका असतो. अशावेळी नागरिकांना इतरत्र हलविण्याची गरज असते. मागील काही वर्षांमध्ये आलेल्या पुरामध्ये येथील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले होते, हे विशेष.

बाॅक्स

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या नद्यांसह इरई, झरपट या नद्या आहेत. या नद्यांतील क्षेत्रामध्ये काही गावांना पुराचा फटका बसतो, तर इरई धरणालगत असलेल्या गावांसह चंद्रपूर शहरालाही पुराचा फटका बसतो. यासोबतच राजुरा, नागभीड, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, मूल, सिंदेवाही या तालुक्यातील गावांना पुराचा धोका असतो.

बाॅक्स

चंद्रपूर शहरात १०१ इमारती धोकादायक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील इमारतींचे महापालिकेने सर्वेक्षण केले असून, शहरातील ३ झोनमध्ये १०१ इमारती धोकादायक आहे. त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात झोननिहाय उपायुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील यांच्या आदेशानुसार धोकादायक इमारत मालकांना नोटीस पाठविण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या इमारती सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बाॅक्स

अग्निशमन दलात रिक्त पदांचे ग्रहण

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महानगरपालिका अग्निशमन दल, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरपंचायती सज्ज आहे. असे असले तरी चंद्रपूर अग्निशमन दलात रिक्त पदांचे ग्रहण आहे. अनेक पदे रिक्त असल्यामुळे येथील कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

पोलीस विभाग, उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालयांमध्ये विविध पथकांचे गठन करण्यात आले आले असून, बचाव व साहित्य उपलब्ध करून दिले जात आहेत.

कोट

मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी केली आहे. तालुका तसेच नगरपरिषद, नगरपंचायत विभागांना सूचना करण्यात आल्या आहे. पोलीस तसेच विविध विभागात पथकांचेही गठन करण्यात आले आहे.

- जितेश सुरवाडे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, चंद्रपूर

Web Title: A lot of rain this year; The district is now in danger of flooding after Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.