यंदा भरपूर आमरस, केशर ११० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:28 AM2021-05-12T04:28:53+5:302021-05-12T04:28:53+5:30
चंद्रपूर : यावर्षी आंब्याला चांगला मोहर आला. त्यामुळे यंदा भरपूर प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सकाळी ...
चंद्रपूर : यावर्षी आंब्याला चांगला मोहर आला. त्यामुळे यंदा भरपूर प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहत असल्यामुळे आवक अधिक असतानाही विक्री होत नसल्याची स्थिती आंब्याची आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, गावरान आंबा अद्यापही विक्रीसाठी आलाच नाही. त्यामुळे काही प्रमाणात केशर, दशहरी या आंब्यालाच मागणी आहे.
जिल्ह्यात विशेषत: नागपूर, आंध्रप्रदेश तसेच इतर भागातून आंब्याची आवक होते. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये ठोक व्यापारी आंब्याची खरेदी करतात. त्यानंतर चिल्लर व्यावसायिक तिथून आंबे आणून बाजार तसेच चौकाचौकात हातठेले लावून विक्री करतात. मात्र यावर्षी सर्वांनाच कोरोनाचा फटका बसला असून विक्रेतेही त्रस्त झाले आहे. मागील वर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी आंबा व्यावसायिकांनी यावर्षी चांगल्या प्रकारे तयारी केली. मात्र यावर्षी सुद्धा बाजारात पाहिजे तशी तेजी नसल्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.
सध्या बाजारामध्ये दशहरी, केशर, लालबाग आदी प्रकारचे आंबे विक्रीला आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आवक वाढल्यामुळे यावर्षी भाव पडले आहे. जे आंबे मागील वर्षी १८० ते २०० रुपये किलो प्रमाणे मिळायचे ते यावर्षी १२० ते १४० रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याचे भाव सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखे आहे.
बाॅक्स
आंब्याची रिटेल किंमत
केशर- ११०
लंगडा-८०
दशहरी -९०
हापूस २००
बाॅक्स
आवक वाढली ग्राहक रोडावले
मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आंब्याची आवक वाढली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहक बाजारात फिरकतच नसल्यामुळे विक्री घटली आहे. पहाटेच्या सुमारास येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रकद्वारे आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे मोठे व्यापारी आंब्याची साठवणूक करून ठेवत आहे. मात्र लहान व्यावसायिकांकडून पाहिजे तशी मागणीच होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे साठवणुकीचा खर्च करावा लागत आहे. आंबा नाशवंत आहे. त्यामुळे वेळीच विक्री केली नाही तर मोठे नुकसानही सहन करावे लागत आहे.
कोट
यावर्षी आंब्याचे उत्पादन बऱ्यापैकी आले आहे. मात्र कोरोना संकटामुळे मागणी घटली आहे. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ढगाळी वातावरण, वादळी पाऊस, कीड यामुळे आंब्याचे उत्पादन कमी येत होते. यावर्षी उत्पादन वाढले मात्र मागणी घटली आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.
-प्रवीण शेंडे
मूल
कोट
यावर्षी प्रथम आंब्याचा बहर गळाला. मात्र त्यानंतर दुसऱ्यांदा आंब्याचा बहार आला आणि उत्पादन बऱ्यापैकी आले आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आंबे झाडालाच असून ते तोडण्यात सुद्धा आले नाही. त्यामुळे पक्षी, मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
-साईनाथ कोडापे
वामनपल्ली
-कोट व्यापारी
सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे बाजारामध्ये आंब्याला मागणी नाही. दरवर्षी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात आंब्याची मागणी असते. यामुळे मोठ्या तसेच लहान व्यावसायिकांचा बऱ्यापैकी फायदा होताे. मात्र मागील वर्षीपासून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच यावर्षी तर भाव सुद्धा कमी झाले आहे.
- मनोहर वासाडे
चंद्रपूर