चंद्रपूर जिल्ह्यातला ‘दुल्हनिया’ नेणारा ‘दिलवाला’ गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:20 AM2018-01-08T11:20:08+5:302018-01-08T11:20:29+5:30
अचानक ‘दुल्हनिया’ला पळवून नेणारा ‘दिलवाला’ लग्नास नकार देतो. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याची अखेर कारागृहात रवानगी केली जाते. एखाद्या चित्रपटासारखे कथानक असलेली ही घटना सावली येथे रविवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रियकर-प्रेयसी लग्नाच्या आणाभाका घेतात. घरच्यांचा विरोध. अशातच प्रेयसीचे लग्न जुळते. लग्नाची तारीख जवळ येते. मनातील उत्कटता दोघांनाही स्वस्थ बसू देत नाही. दोघेही पळून जातात. मात्र नंतर अचानक ‘दुल्हनिया’ला पळवून नेणारा ‘दिलवाला’ लग्नास नकार देतो. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याची अखेर कारागृहात रवानगी केली जाते. एखाद्या चित्रपटासारखे कथानक असलेली ही घटना सावली येथे रविवारी घडली.
गणेश मारोती शेंडे (२९) रा. सावली असे या प्रियकराचे नाव आहे. गणेश आणि येथील एका युवतीचे मागील पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. गणेश नोकरीसाठी बाहेरगावी राहत होता तर ती सावलीत. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या युवकाशी जुळविले. आता काही दिवसानंतर लग्नसोहळा संपन्न होणार होता. यादरम्यान, दोघांच्याही गाठीभेटी नव्हत्या. अशातच गणेशचे जुने प्रेम जागृत झाले आणि त्याने प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. प्रेयसीनेही कसलाही विचार न करता त्याला होकार दिला आणि प्रियकराच्या सांगण्यानुसार दोघेही चंद्रपूरला पळून आले. मात्र अचानक काय झाले कुणास ठाऊक? प्रियकराने आपला निर्णय बदलवत अचानक लग्नास नकार दिला. यामुळे प्रेयसीला धक्का बसला. क्षणार्धात स्वप्नाचा चुराडा झाला. यादरम्यान, ज्याच्यासोबत लग्न जुळले होते, त्यानेही हात वर केले होते. परिणामी तिला व तिच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्काच बसला.
दोघेही एकाच समाजाचे असल्याने या प्रकरणी समाजाची बैठक बोलाविण्यात आली. मात्र यात काहीही तोडगा न निघाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाण्याबाहेर समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. ठाणेदार स्वप्नील धुळे, उपनिरीक्षक शेख, महिला पोलीस, नगराध्यक्ष, समाजातील काही मान्यवर तसेच दोघेही प्रियकर- प्रेयसी व उभयतांचे कुटुंबीय या सर्वाची बैठक घेण्यात आली. यात प्रियकराचे समुपदेशन करण्यात आले. मात्र प्रियकर लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळे प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश मारोती शेंडे (२९) याच्याविरुद्ध ३६६ कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.