अल्प मतदान कुणाच्या पथ्यावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:02 AM2018-08-20T00:02:58+5:302018-08-20T00:04:52+5:30
भद्रावती नगर परिषदची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत केवळ ५७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का घसरल्याने सर्वच पक्षातील दिग्गज उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. यावेळी ३२ हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती नगर परिषदची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत केवळ ५७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का घसरल्याने सर्वच पक्षातील दिग्गज उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. यावेळी ३२ हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नगराध्यक्षपदाच्या आठ तर नगरसेवकपदाच्या २७ जागांसाठी मतदान रविवारी मतदान झाले. नगरसेवकपदासाठी १४५ उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्षपदाची मुख्य लढत शिवसेनेचे अनिल धानोरकर व भाजपाचे सुनील नामोजवार यांच्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीआरएसपीचे अॅड. भुपेंद्र रायपुरे हेसुद्धा नगराध्यक्षपदासाठी मुसंडी मारू शकतात, अशीही चर्चा शहरात रंगत आहे. यंदाच्या निवडणुकीत कमी मतदान झाल्याने सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. विजयासाठी उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. बहुतेक प्रभागामध्ये आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार उभे झाले होते. त्यामुळे नगरसेवकपदासाठीही अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक ८ (अ) मध्ये शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी व भाजपाचे योगेश गाडगे, प्रभाग क्र. ६ (ब) मध्ये शिवसेनेचे संतोष आमने व राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहन कुटेमाटे (ब) मध्ये शिवसेनेच्या छबु राऊत व काँग्रेसच्या सरिता सूर, प्रभाग क्र. १ (ब) मध्ये शिवसेनेचे विनोद वानखेडे व भाजपाचे मनोज आष्टनकर प्रभाग ७ (अ) मध्ये अपक्ष उमेदवार नंदू पठाल व शिवसेनेचे नागपुरे (ब) काँग्रेसच्या शितल गेडाम, भाजपाच्या स्वप्ना शेरकुरे व शिवसेनेच्या मोनिका दोडके, प्रभाग क्र. ५ (ब) मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खारकर, भारिप बहुजन महासंघाचे संदीप चटप, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे फैयाज शेख आदी उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला होता. मतदारांशी संपर्क साधून शहर विकासाची आश्वासने दिलीत. त्यामुळे प्रचारात मोठी रंगत आली होती. प्रभाग क्र. २ (ब) मध्ये भारिप बहुजन महासंघाचे सुनील खोब्रागडे व शिवसेनेचे रमेशदास यांनीही प्रचारात मुसंडी मारली. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच चुरस होण्याची चर्चा सुरू आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरू झाली. पण काही मतदान केंद्रामध्ये शुकशुकाट होता. दुपारी १.३० वाजतापासून मतदानाला वेग आला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ५.६२ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत २९.११ टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी ३.३० वाजेपर्यंत केवळ ४४ टक्के मतदान झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. मतदानाची टक्केवारी घसल्याने शहरातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
आज मतमोजणी
नगर परिषद निवडणूकीची मतमोजणी सोमवारी चिरादेवी मार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सकाळी सहा ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यत कलम १४४ लागू केली आहे. त्यामुळे मतमोजणी परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्याथवर बंदी घालण्यात आली आहे.