दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा निम्न पैनगंगा प्रकल्प दिवास्वप्नच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:24+5:302021-03-04T04:52:24+5:30
कोरपना : विदर्भातील सिंचनाच्या क्षेत्रात द्वितीय क्रमांकावर असलेला निम पैनगंगा प्रकल्प अद्यापही रखडला आहे. त्यामुळे कोरपना, राजुरा या दुर्गम ...
कोरपना : विदर्भातील सिंचनाच्या क्षेत्रात द्वितीय क्रमांकावर असलेला निम पैनगंगा प्रकल्प अद्यापही रखडला आहे. त्यामुळे कोरपना, राजुरा या दुर्गम तालुक्यासह चंद्रपूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतजमीन सिंचनाखाली येणार होती. मात्र या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिवास्वप्नच ठरला आहे. यासाठी शासन व प्रशासनाची उदासीनता कारणीभूत ठरली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे होत असलेला निम्न पैनगंगा हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे २ लाख २७ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीला फायदा होणार आहे. यात यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यासह तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील शेतीलाही याचा लाभ होणार आहे. मात्र प्रकल्पाचे काम रखडण्यामागे केवळ शासनाची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. या प्रकल्पाचा खर्च १,४०० कोटीवरून ३० हजार कोटींवर गेला आहे. परंतु प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू करण्यात कुठल्याही हालचाली नाही.
३५० कोटी रुपये खर्च
या प्रकल्पावर आजवर ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. १,८०० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. जून २०११ मध्ये धरणाचे सुरू झालेले काम ७ मे २०१२ पासून बुडीत क्षेत्रातील धरण विरोधी समितीच्या विरोधानंतर बंद पडले. ते आज सात ते आठ वर्ष उलटूनही सुरू झाले नाही. त्यामुळे या ठिकाणी केवळ पिल्लरचे खांब उभे दिसतात. शासनाच्या पैशाचा ही चुराडा झालेला दिसतो. ब्रिटिश काळात नियोजनात असलेला प्रकल्प आहे. यानंतरच्या अनेक धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र हा प्रकल्प राजकीय इच्छाशक्तीअभावी अडकलेला आहे. राजकीय हेवेदावे सोडून प्रकल्प पूर्ण
होणे भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रकल्पाचे फायदे
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ताडसावली गावाजवळ हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जलविद्युत निर्मिती करता येईल. तसेच नदी पट्ट्यातील भागातील शेती सिंचन, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, उद्योगधंदे यांना याचा फायदा होईल. पाण्याचे नियोजन योग्यरीत्या होऊन पिण्याच्या पाण्याची चांगली सोय निर्माण होईल.