म. गांधी १५० वे जयंती वर्ष; चंद्रपूर नगर परिषदेने प्रदान केले होते गौरवपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:03 PM2019-10-01T16:03:39+5:302019-10-01T16:04:11+5:30
असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले होते.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रिटीश सत्तेविरूद्धचा भारतीय स्वातंत्र्यलढा देशभरात पोहोचावा, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी विविध राज्यांमध्ये दौरे करून जनमानस चेतविले. असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
देशभरात असहकार आंदोलन सुरू केल्यानंतर महात्मा गांधी हे १९२७ च्या फेब्रुवारी महिन्यात सेवाग्राम येथे होते. दरम्यान, चंद्रपुरातील तत्कालीन नेते पंडित बालगोंविद तिवारी, विश्वनाथ दीक्षित, मा. सां. कन्नमवार, बाजीराव फुलझेले, बळवंतराव देशमुख, पुराणिक, सेठ लोमाकरण, कोवळे, शंकर वैद्य, डॉ. तेलंग, अब्दुल रजाक आदींच्या उपस्थितीत दाजीबाजी देवईकर यांच्या घरी बैठक घेतली. गांधीजींना चंद्रपुरात बोलाविण्याचे निश्चित केले. त्यानंतर देवईकर व मा. सां. कन्नमवार यांनी सेवाग्राम येथे जाऊन गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी ४ फेब्रुवारी १९२७ रोजी येण्याचे मान्य करताच जय्यत तयारी करण्यात आली. टिळक मैदानात जाहीर सभा झाली. स्वागत समितीचे अध्यक्ष विश्वनाथ दीक्षित व सचिव खुशालचंद्र खजांची यांनी भूषविले. नगर परिषदने गांधीजींना गौरवपत्र प्रदान केले. महात्मा गांधीजींनी चंद्रपूर शहराला १४ नोव्हेंबर १९३३ रोजी दुसऱ्यांदा भेट दिली. यावेळी अस्पृश्यता निवारणाचा विचार मांडण्यासाठी याच मैदानावर सभा झाली. या सभेत बहुसंख्य दलित बांधवांना बोलावण्यात आले. देवाजी बापू खोबरागडे यांनीही विचार मांडले. चंद्रपुरातील जनतेने गांधीजींना सात हजारांची थैली प्रदान केली.