अतिक्रमणावर वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:42 PM2017-12-09T23:42:11+5:302017-12-09T23:42:24+5:30
अतिक्रमणामुळे चंद्रपुरातील रस्ते अरुंद आणि चौक बजबजले आहेत. यामुळे शहरसौंदर्याला बाधा पोहचत असून वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. त्यामुळे आता मनपाने हे अतिक्रमण गंभीरतेने घेतले असून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अतिक्रमणामुळे चंद्रपुरातील रस्ते अरुंद आणि चौक बजबजले आहेत. यामुळे शहरसौंदर्याला बाधा पोहचत असून वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. त्यामुळे आता मनपाने हे अतिक्रमण गंभीरतेने घेतले असून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे.
चंद्रपुरात लोकसंख्या व वाहतुकीच्या तुलनेत फारच कमी रस्ते आहेत. यातच मुख्य रस्ते तर अतिक्रमणाने आणखी अरुंद झाले आहेत. रस्त्यावरच अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. काही मोठ्या व्यावसायिकांनी तर फुटपाथवरच पक्के बांधकाम केले आहे. चौकांची स्थितीही याहून वेगळी नाही. बागला चौक, जटपुरा गेट चौक, बंगाली कॅम्प चौक, एसटी वर्कशॉप चौक, बसस्थानक चौक यासारखे चौक अतिक्रमणाने बरबटले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याला ग्रहण लागत आहे.
आता मात्र मनपा याबाबत गंभीर झाली आहे. मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमण, अवैध पक्के बांधकाम काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणित पक्क्या बांधकामावर मनपाने बुलडोजर चालवून चौक मोकळा केला. येथील मटण मार्केट कायमचा हटविला. यानंतर आता बसस्थानक, एसटी वर्कशॉप, बागला चौकातील अतिक्रमणही काढण्यात येणार आहे. यासाठी मनपाने अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष ठोंबरे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. प्रत्येक आठवड्यात मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याकडून प्रस्तावित आराखड्यानुसार पथकाला निर्देश दिले जाते. त्यानुसार पथक अतिक्रमण हटाव मोहीम राबवित आहे.
परिस्थिती जैसे ते होऊ नये म्हणून...
महानगरपालिकेकडून दर दोन-चार महिन्यात मोहीम राबवून अतिक्रमण काढले जाते. रस्त्यावरील किरकोळ व्यावसायिकांना हटवून रस्ते व चौक मोकळे केले जाते. मात्र त्यानंतर पुन्हा हे व्यावसायिक आपल्या जागेवर येतात व स्थिती जैसे थे होते. आता असा प्रकार होऊ नये, म्हणून मनपा अतिक्रमण काढताच त्या ठिकाणी तत्काळ प्रस्तावित कामे करणार आहे.
बसस्थानक चौकात सौंदर्यीकरण
बसस्थानकासमोर अतिक्रमण लवकरच मनपाच्या पथकाकडून हटविले जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी दोन कामे प्रस्तावित आहेत. बसस्थानकाच्या बाजुला असलेला उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठा केला जाऊ शकते. असे झाले नाही तर मनपा बसस्थानक चौकाचे सौंदर्यीकरण करणार आहे.
या चौकाचे झाले सौंदर्यीकरण
मनपाने चंद्रपुरातील गांधी चौक व प्रियदर्शिनी चौकातील अतिक्रमण हटवून या चौकाचे सौंदर्यीकरण केले आहे. यासोबतच रामाळा तलाव, पटेल हॉयस्कूलजवळचा परिसर मोकळा करून तिथेही सौंदर्यीकरण केले आहे.