महाबीजच्या बियाण्यांचे परमीट शेतकऱ्यांना घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:57+5:302021-06-09T04:35:57+5:30
तालुका कृषी कार्यालयाचा उपक्रम मासळ (बु.) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. रुग्ण संख्या वाढली होती. ...
तालुका कृषी कार्यालयाचा उपक्रम
मासळ (बु.) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. रुग्ण संख्या वाढली होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला तालुका कार्यालयात जाणे शक्य नव्हते. कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता तालुका कृषी कार्यालय, चिमूरच्या वतीने कृषी सहाय्यक यांच्या मार्फत मासळ परिसरातील शेतकऱ्यांना महाबीज बियाण्यांच्या परमीटचे वितरण घरपोच केले आहे.
कृषी विभागातर्फे महाडीबीटी पोर्टलवर संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व योजनांचा एकत्रित लाभ मिळावा, यासाठी पोर्टलमार्फत शेतकऱ्यांनी भात, तूर, सोयाबीन, कापूस या अनुदानित बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले. त्यात परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्याची लॉटरी लागली आहे. सोमवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. खरीप पिकांच्या पेरणी व लागवडीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाने बचत गटामार्फत खत पोहोचविणे सुरू केले असले तरी कृषी दुकानामध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत भात, तूर, कापूस, सोयाबीन पिकांचे बियाणे अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना प्रथमच राज्यस्तरावरून ऑनलाईन सोडत पद्धतीने सवलतीच्या दरात बियाणे मिळणार आहे. शेतकऱ्यांना बियाण्याचे परमीट तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे यांच्या मार्गदर्शनात कृषी सहाय्यक बळीराम येवले व कृषी पर्यवेक्षक गौतम टेंभुर्णे यांच्या मार्फत घरपोच दिले जात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
बॉक्स
बोगस बियाण्यांची भीती
मागील वर्षात तालुक्यातील काही भागात बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळाल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या वर्षात तालुका कृषी विभाग कार्यालय, चिमूरच्या मार्फत मासळ परिसरात भाताची बीज प्रक्रिया, सोयाबीन उगवण क्षमता अशा विविध योजना राबविण्यात आल्या.
कोट
अनुदानावर बियाण्याच्या लॉटरीत नंबर लागला आहे. कृषी सहाय्यकाच्या मार्फत घरपोच बियाण्याचे परमीट मिळाले.
- कैलास गणवीर, शेतकरी, मासळ (बु.).