‘ते’ गाव नावाजले, मात्र वादंगाने गाजले; ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 01:09 PM2022-10-12T13:09:36+5:302022-10-12T13:25:22+5:30
सरपंचाची पोलिसांत तक्रार, तिघांविरुद्ध गुन्हा
पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील महिलांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने गावाचे नाव गाजले. मात्र, याच महादवाडीत वादंग निर्माण होत असून, कोणत्या ना कोणत्या कारणाने गाव चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. येथील ग्रामपंचायतला ७ ऑक्टोबर रोजी ६ वाजेच्या सुमारास भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जगदीश मेश्राम यांनी कुलूप ठोकले. याविरोधात सरपंच भोजराज कामडी यांनी पोलिसात तक्रार दिल्याने मेश्राम यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महादवाडी ग्रामपंचायतचे शिपाई सिद्धार्थ रामटेके यांना शासकीय दस्तावेज व आर्थिक घोळ केल्याच्या कारणांमुळे कामावरून कमी केले होते. गोंगले नामक व्यक्तीच्या जागेचा वाद होता. याच मुद्द्यांवरून भीम आर्मी संघटनेचे जगदीश मेश्राम व इतर तीन जणांनी महादवाडीत येऊन सरपंचांना फोन केला. शिपाई सिद्धार्थ रामटेके व गोपीचंद गोंगले यांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेऊन चौकशीसाठी आलो, अशी माहिती दिली.
सरपंच भोजराज कामडी यांनी जगदीश मेश्राम यांना लेखी पत्र द्या तुम्हाला माहिती देतो. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असेही फोनवर सांगितले. त्यानंतर मेश्राम हे महादवाडी येथील सिद्धार्थ रामटेके व रवींद्र रामटेके यांच्या घरी आले व प्रेमिला लोगडे यांचे घरी जाऊन आम्ही अधिकारी आहोत, आम्हाला महिला मंडळाची सभा ग्रामपंचायतमध्ये आहे, अशी बतावणी करून महिलांना बोलविले. सभा न घेता संघटनेचे मेश्राम यांनी ग्रामपंचायतच्या मुख्य द्वाराला कुलूप ठाेकले, अशी तक्रार सरपंच कामडी यांनी दिली. तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी जगदीश मेश्राम व इतर तिघांविरुद्ध भादंवि ३५१, ५०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलीस हवालदार मोहन धानोरे व पोलीस शिपाई दगडू सरवदे यांनी पंचनामा करून कुलूप तोडण्याची विनंती केली. मात्र सरपंच कामडी व गावकऱ्यांनी ज्यांनी कुलूप ठोकले त्यांनीच काढावे, अशी भूमिका घेतली. परिणामी ग्रामपंचायत अजूनही कुलूपबंद आहे.
प्रशासकीय अधिकारी किंवा आरोपी आल्यावरच कुलूप काढू, असा पवित्रा सरपंच व गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कुलूपबंद आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सर्व चौकशी करून अटकेची कारवाई करू.
- मोहन धनोरे, अंमलदार, पोलीस ठाणे, चिमूर
लोकांच्या तक्रारीनुसार एसडीओला निवेदन दिले होते. ग्रामपंचायतला भेट दिली. मात्र तिथे लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक हजर नव्हते. ग्रामसेवकांना फोनवरून माहिती दिली असता टाळाटाळ केली. त्यामुळे ग्रामपंचायतला कुलूप ठोकले.
- जगदीश मेश्राम, अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दल, चिमूर