प्रकल्प उभारणीतील विलंबामुळे महाजनकोला दीड हजार कोटींचा फटका
By admin | Published: July 8, 2015 01:09 AM2015-07-08T01:09:41+5:302015-07-08T01:09:41+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आठ आणि नवव्या क्रमांकाच्या संचाच्या उभारणीचे काम बीजीआर कंपनीकडे देण्यात आले असले तरी,
बीजीआर कंपनीवर कृपादृष्टी : ८ व ९ युनिटचे करारनुसार काम अपूर्णच
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आठ आणि नवव्या क्रमांकाच्या संचाच्या उभारणीचे काम बीजीआर कंपनीकडे देण्यात आले असले तरी, या प्रकल्पातील यंत्रणेचे काम अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. परिणामत: व्यावसायिक तत्वावर वीज निर्मीती करण्यास विलंब होत असल्याने महाजनकोला जवळपास १ हजार ५०० कोटी रूपयांचा फटका बसला आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आठ व नवव्या संचाचे काम २०१२ च्या मार्च व जून महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. तसा करारही बीजीआर कंपनीसोबत झाला होता. मात्र कालावधी लोटूनही काम पूर्ण झाले नाही. परिणामत: प्रकल्पाची किंमत वाढत गेली. सध्याच्या अनुमानानुसार, दीड हजार कोटी रूपयांनी या प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा भूर्दंड महाजनकोवरच बसणार आहे.
आठ व नऊ क्रमांकाच्या संचाच्या उभारणीचे काम भेल आणि बीजीआर या कंपन्यांना देण्यात आले होते. त्यातील प्रकल्पाच्या बॉयलर टर्बाईन जनरेटरचे काम भेलला देण्यात आले होते. तर, हे काम वगळून अन्य सर्व कामे बीजीआर कंपनीला देण्यात आली होती.
मागील तीन महिन्यांपूर्वी या प्रकल्पातील वीज निर्मीतीची चाचणी यशस्वीरित्या पार पडलीदेखील. मात्र या युनिटला इंधन पुरविणाऱ्या यंत्रणा, अॅश पाईपलाईन अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. यामुळे हा प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. परिणामत: महाऔष्णिक विद्युत केंद्राचे करोडो रूपयांचे नुकसान दररोज होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
महाजनकोने बीजीआरसोबत केलेल्या करारनुसार, कामात विलंब झाल्यास कंत्राट काढून घेण्याची तरतूदही आहे. प्रसंगी संपूर्ण करारच रद्द करण्याचीही तरतुद आहे. मात्र बीजीआरवर कसलीही कारवाई होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अन्य ठिकाणीही विलंब
राज्यातील परळी, खापरखेडा, चंद्रपूर, भूसावळ येथे नवीन प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. मात्र या सर्वच ठिकाणी कामात प्रचंड विलंब होत असल्याने सरकारचे नुकसान होत आहे. वीज उत्पादनातही घसरण होत आहे. अधिकाऱ्यंकडून कंपन्यांची होणारी पाठराखणच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.