महाकाली मंदिर परिसर ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:52+5:302021-06-02T04:21:52+5:30
पीक कर्ज रकमेची मर्यादा वाढवा चंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे पीक कर्ज रकमेची मर्यादा ...
पीक कर्ज रकमेची मर्यादा वाढवा
चंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे पीक कर्ज रकमेची मर्यादा वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, कापूस, सोयाबीन तूर, धान आदी पिकांच्या लागवडीकरिता मोठ्या प्रमाणात पैसा लागत असला तरी पीक कर्ज मात्र मर्यादित भेटत असल्यामुळे शेतकऱ्यांना तडजोड करावी लागत आहे.
मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
चंद्रपूर : धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. असे असले तरी काही भागात कापूस, ज्वारी तसेच सोयाबीनचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरीप हंगाम अगदी काही दिवसावर आला असल्याने शेतकऱ्यांनी कोरोनाच्या दहशतीमध्ये मशागतीची कामे सुरू केली आहेत. उन्हामुळे शेतकरी पहाटेच शेतात जात असून दुुपारपर्यंत घरी येत आहेत.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले.
झरपट नदीवर जाणाऱ्यांना निर्बंध घाला
चंद्रपूर : येथील झरपट नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात महिला कपडे धुण्यासाठी जात असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महिलांवर निर्बंध घालावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, अनेक मुलेही या नदीवर पोहण्यासाठी जातात.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
चंद्रपूर : जिल्ह्यात ज्वारी पिकाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे कडब्याची टंचाई भासत असून, कडब्याच्या एका पेंडीला ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहे. परिणामी पशुधन सांभाळायचे कसे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
घरकुलांची कामे झाली ठप्प
चंद्रपूर : तालुक्यात अनेक शासकीय कामे व घरकुलांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र रेतीअभावी ही कामे प्रभावित झाली असून घरकुलांची सुरू झालेली कामे पूर्णत: ठप्प पडली आहेत.
नाल्यांना झुडपांचा वेढा
चंद्रपूर : शहरातील बहुतांश नाल्यात मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहेत. पावसाचे दिवस तोंडावर आल्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नाल्यातील झुडपांची स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाजारात गर्दी वाढली
चंद्रपूर : शहरातील गोल बाजार, गांधी चौक, बंगाली कॅम्प, तुकूम, एसटी वर्कशाॅप, जटपुरा गेट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गोल बाजार परिसरात बाजारपेठ असल्याने सकाळपासून ही बाजारपेठ गजबजलेली असते. यामध्ये विक्रेत्यांसह ग्राहकही मोठ्या प्रमाणात येतात.
पोलीस पाटलांना मानधनाची प्रतीक्षा
चंद्रपूर : ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांचे मानधन मागील सहा महिन्यापासून थकीत आहे. परिणामी पोलीस पाटलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित मानधन देऊन आर्थिक कोंडी सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.
रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्यावे
चंद्रपूर : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. घुग्घुस, चंद्रपूर, गडचांदूर परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी, लोखंड कारखाना, सिमेंट कंपन्या आहेत. त्यामुळे स्थानिक युवकांनाच यामध्ये रोजगार देण्याची मागणी युवकांकडून केली जात आहे. सध्या लॉकडाऊनमुळे युवकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य पसरले आहे.