महाकालीची ओढ लागली जीवाला...

By admin | Published: April 9, 2017 12:49 AM2017-04-09T00:49:25+5:302017-04-09T00:49:25+5:30

नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत.

Mahakali was stunned ... | महाकालीची ओढ लागली जीवाला...

महाकालीची ओढ लागली जीवाला...

Next

५० वर्षांपासून वारी : भोपाळ, नांदेड, बीड, परभणी, तेलंगणाचे भक्त दर्शनाला आतूर
चंद्रपूर : नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत. या भाविकांच्या गर्दीमुळे महाकाली मंदिराचा परिसर फुलून गेला आहे. मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. माता महाकालीची अंतर्मनात भक्ती असून डफड्याच्या तालावर आपल्याच नादात जाणारे भक्त लक्ष वेधून घेत आहेत.
शेकडो किलोमीटरचा प्रवास करुनही चेहऱ्यावर जराही थकवा न दिसणारे मराठवाड्यातील भाविक या भक्तीमेळ्यात आनंदाचे बीज पेरून जातात. नांदेड येथून गेल्या ३५ वर्षांपासून महाकालीच्या दर्शनासाठी येणारे परसराम बामणे म्हणाले की, महाकालीचे आपल्यावर लक्ष असल्याने वयाच्या ३५ व्या वर्षीपासून नियमीत यात्रेला येतो. त्यामुळे आपण मागीतलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. व महाकाली मातेला भेटण्याचा आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले.
चंद्रपूरची यात्रा पूर्वी पंधरा दिवस ते पाऊण महिना चालायची. मात्र ही वैभवी यात्रा अलिकडे आठवड्यावर आली आहे. प्रवासाची साधने वाढल्याने भाविक खाजगी वाहनाने येतात. दर्शन झाल्यावर रात्रभर थांबून परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे अलिकडच्या काळात यात्रेचे दिवस कमी झाले असले तरी भक्तीचा पूर मात्र कायमच आहे.
नांदेड जिल्ह्यातील चिकाळा तांडा येथून आलेले आनंदसिंग धनसिंग राठोड यांनी सांगितले की, मागील तीन वर्षापासून संपूर्ण परिवारासोबत गावच्या जवळपास ५० भाविकांसोबत मातेच्या दर्शनाला येतो. महाकाली मातेचे दर्शन केल्याने साक्षात देव भेटल्यासारखे वाटते. मनाला आनंद होतो. त्यामुळे याठिकाणी आठवडाभर संपूर्ण परिवारासोबत येथे वास्तव्यास राहत असतो.
आनंदसिंग राठोड यांच्याप्रमाणे पहिल्याच वर्षी मातेच्या दर्शनासाठी आलेले परभणीचे अजय गुंडाळे यांनी जीवनार्च सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, यात्रेला येण्याचा पहिलाच वर्ष आहे. मात्र महाकाली यात्रेला आल्याने आनंद झाला. अनेक वर्षापासूनची दर्शन घेण्याची ईच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आता दरवर्षी महाकाली यात्रेला येण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या सुभाबाई सोपान सूर्यवंशी यांनी मातेच्या आशिर्वादाने सुखी संसार सुरू असल्याची माहिती दिली.
परळी येथील सागरबाई बल्लाळ दोन दिवसांपासून महाकाली मंदिर परिसरात मुक्कामाला आहेत. महाकालीने त्यांची मनोकामना पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. मायेच्या वाटेला येताना १० वर्ष पूर्ण झाले आहेत. गावातील देवकरीण व परिसरातील भाविकांसोबत मायेच्या वाटेला येत असतो. त्यामुळे एकप्रकारचे समाधान लाभत असते. आजपर्यंत जे मागीतले त्या सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे नियमीत यात्रेला येत असते, असेही सागरबाई यांनी स्पष्ट केले. परळीचेच भरत जाधव म्हणाले की, मागील सात वर्षांपासून नियमित येत आहे. आठवडाभर मातेच्या चरणी राहत असतो. त्यामुळे मन प्रसन्न होत असते. आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे दरवर्षी महाकाली यात्रेला येत असतो. (नगर प्रतिनिधी)

दर्शनासाठी लागल्या रांगा
चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त साधून झरपटच्या पात्रात पवित्र स्रान करण्याची देवी महाकालीच्या भक्तगणांची परंपरा आहे. या स्रानानंतर दर्शनाच्या रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी त्यांची लगबग असते. कुटुंबातील बायकापोरांसह आणि वृद्धांसह आलेलेही अनेक जण यात सहभागी असतात. यंदा शुक्रवारी चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मूहूर्त आहे. अजूनही भाविकांचे जत्थे दाखल होणे सुरूच आहे. परिसरात घुमणारे पोतराजे आणि लयबद्धपणे वाजणाऱ्या डफड्यांमुळे हा परिसर सध्या २४ तास निनादतो आहे.
यात्रेला नियमित येण्याचा संकल्प
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून पहिल्यांदाच आलोक शर्मा महाकालीच्या दर्शनासाठी आले आहेत. त्यांचा महाकालीच्या यात्रेला येणाऱ्या हा पहिलाच अनुभव आहे. यात्रेला आल्याने दर्शन झाले. महाकालीच्या दर्शनानंतर त्यांच्या मनाला समाधान लाभले. त्यामुळे त्यांनी आता यात्रेला नियमित येण्याचा संकल्प केला आहे.

Web Title: Mahakali was stunned ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.