महाकाली यात्रेत भाविकांची वाढली गर्दी
By admin | Published: April 7, 2017 12:53 AM2017-04-07T00:53:47+5:302017-04-07T00:53:47+5:30
गेल्या चार दिवसांपासून चंद्रपूरचे आराध्य दैवत प्रसिद्ध महाकाली मातेच्या यात्रेला शुभारंभ झाला आहे. दररोज गर्दी वाढत चालली आहे.
सुरक्षेवर कॅमेऱ्यांची करडी नजर : ५० पोलीस, ३४५ होमगार्ड तैनात
चंद्र्रपूर : गेल्या चार दिवसांपासून चंद्रपूरचे आराध्य दैवत प्रसिद्ध महाकाली मातेच्या यात्रेला शुभारंभ झाला आहे. दररोज गर्दी वाढत चालली आहे. या यात्रेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी महाकाली संस्थान व बागला चौकात कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची दक्षता म्हणून अधिकाऱ्यांसह ५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे सुमारे ३४५ जवान गस्त घालत आहेत. महाकाली मंदिर संस्थानचे गार्ड मंदिरामधील सुरक्षा व्यवस्था पाहात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील महाकालीच्या भक्तांचे आगमन सुरू झाले आहे.
चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी महाकाली अशी तिची ख्याती आहे. त्यामुळे तिचे भक्त चंद्रपूरच्या तापनामाची आणि उन्हाची पर्वा न करता एप्रिल महिन्यात होणाऱ्या यात्रेला दरवर्षी येत असतात. यावर्षीदेखील मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. यात्रेकरूंच्या वाढत्या गर्दीनुसार यात्रेमध्ये दुकाने सजू लागली आहेत. झरपट नदीच्या काठावर असलेल्या महाकाली मंदिरात ही यात्रा सुरू झाली आहे. त्याकरिता झरपट नदीमध्ये स्वच्छता अभियान राबवून तिचे पात्र स्वच्छ करण्यात आले. बाहेर गावावरून येणारे भक्त महिला व पुरुष तेथे आंघोळ करीत आहेत. विविध प्रकारच्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेची दक्षता म्हणून पोलीस व गृहरक्षक विभाग सज्ज आहे.
पोलीस विभागातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान व पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ताजने यांनी सुमारे ५० अधिकारी व पोलीस शिपायांची चमू तैनात केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बोरकुटे यांच्या नेतृत्त्वात पोलीस उपनिरीक्षक भडके व पोलीस उपनिरीक्षक चिंचोळकर आणि ३० पोलीस शिपाई यात्रेमध्ये २४ तास सेवा देत आहेत. गृहरक्षक दलातर्फे (होमगार्ड) नऊ अधिकाऱ्यांसह ३४५ जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये ३३६ सैनिकांचा समावेश असून ९५ महिला व २५० पुरूष होमगार्ड आहेत. (प्रतिनिधी)
दोन पोलीस चौक्या
सुरक्षेच्या दृष्टीने यात्रा परिसरात दोन अस्थायी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. एक पोलीस चौकी महानगर पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयालगत आहे, तर दुसरी पोलीस चौकी अगदी मंदिराच्या प्रवेशवदाराजवळ आहे. पहिल्या पोलीस चौकीत तक्रारींचा समावेश असतो, तर दुसऱ्या पोलीस चौकीमध्ये हरविलेल्या व्यक्तींची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्याचे गुरूवारी दुपारी दिलेल्या भेटीमध्ये दिसून आले. या चौक्या २४ तास सुरू असतात. अद्याप कसलीही मोठी तक्रार दाखल झाल्याची नोंद नाही. या पोलिसांकरिता स्वयंसेवी संस्थांनी थंड पाण्याच्या पिण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे.
पेट्रोलिंगसाठी दोन वाहने
यात्रा परिसरात पेट्रोलिंगसाठी दोन वाहने देण्यात आली आहेत. डी.बी. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बोंद्रे यांच्या नेतृत्त्वात १५ शिपायांचे पथक गस्तीवर आहे. त्यानाही अद्याप गंभीर गुन्हा घडल्याचे आढळून आलेले नाही. कोणी हरविल्याची माहिती घेऊन आल्यास आधी मोबाईलवरून गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याची माहिती दिली जात आहे. तासभरात हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. याशिवाय इतर तैनात पोलीसदेखील यात्रा परिसरात पायी गस्त घातल आहेत.
पोलीस मित्रांचीही मदत
सुरक्षा यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस अधिकारी-शिपाई आणि गृहरक्षक दलाचे जवान डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहेत. त्यांच्या मदतीला पोलीस मित्रांचीही सेवा मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लिलाधर जंजीलवार हे पोलीस मित्र म्हणून यात्रेमध्ये पोलिसांना मदत करीत आहेत.
आजपासून थंड पाण्याची व्यवस्था
थंड पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांतर्फे महाकाली यात्रेमध्ये भक्तांसाठी मोफत थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत नऊ ठिकाणी हे पाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून यात्रेकरूंना दिले जाणार आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. त्यामध्ये यात्रेकरूंना उन्ह लागून आजारी पडू नये, याकरिता ही काळजी घेण्यात आली आहे.