महाकाली यात्रेसाठी चंद्रपुरात दाखल झाले भाविकांचे जत्थे, आज मुख्य पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:32 AM2023-03-27T10:32:45+5:302023-03-27T10:33:50+5:30
पहाटे घटस्थापना : विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेशातून येतात भाविक
चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकालीची यात्रा सोमवार चैत्र शुद्ध षष्ठी आजपासून (दि.२७) सुरू होत आहे. यासाठी विदर्भ, मराठरावाडा, तेलंगणातील भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहेत. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महापालिका तसेच महाकाली मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण तयारी केली आहे. सोमवारी सकाळी ५ वाजता देवीला स्नान अभिषेक त्यानंतर वस्त्र परिधान करून दागिने घालण्यात येणार आहे. त्यानंतर महापूजा, घटस्थापनेनंतर मंदिर भाविकांसाठी सुरू होणार आहे. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक सुनील नामदेव महाकाले यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाणार आहे.
ऐतिहासिक महाकाली मंदिर परिसरात दरवर्षी चैत्र पौर्णिमेला आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा भरते. विदर्भ, मराठवाडा, तेलंगणासह इतर भागातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सोमवारी देवीची मुख्य पूजा तसेच घटस्थापना असल्याने भाविक मिळेल त्या वाहनाने चंद्रपुरात दाखल होत आहे.
भक्तांच्या निवासाकरिता मंदिराच्या आतील परिसरात शेड तयार करण्यात आले आहेत. शिवाय, मंडप टाकण्यात आला. ही यात्रा पुढील महिनाभर चालणार आहे. यात्रेमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन तसेच महाकाली देवस्थान काळजी घेत आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला असून, मंदिर परिसरात पोलिस चौकी उभारण्यात आली आहे.
वॉटर कूलिंग प्लान्ट
पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्थापनाने चार हजार लिटर क्षमतेचा वॉटर कुलिंग प्लान्ट तयार केला. या प्लान्टला २०पेक्षा अधिक नळ लावण्यात आले आहेत. याशिवाय, मनपाकडून नळांची व्यवस्था करण्यात आली.
सामाजिक संघटनांचे सहकार्य
महाप्रसाद वितरण करण्यासाठी वेगळा कक्ष तयार करण्यात आला. महाकाली महाप्रसाद वितरण समिती, जलाराम सेवा मंडळ, कोल कंत्राटदार मंडळ व जैन समितीने याकरिता पुढाकार घेतला आहे. वाहनांमुळे गर्दी होऊ नये, याकरिता वाहनतळ तयार करण्यात आले आहे.
दर्शन रांगेसाठी विशेष व्यवस्था
'भक्तांच्या रांगेकरिता सहा हजार फूटांचा शेड तयार आहे. रांगेत उभे राहताना त्रास होऊ नये, यासाठी रेलिंग, पिण्याचे पाणी व पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बैलबाजार परिसरातही भक्तांसाठी निवास कक्ष तयार करण्यात आला. परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरापेट्या जागोजागी ठेवण्यात आल्या आहे.