सामान्य रुग्णालयातून वृद्ध आईसह महिला रूग्ण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:40 AM2018-06-13T00:40:52+5:302018-06-13T00:40:52+5:30
येथील अमराई वॉर्ड क्रमांक १ मधील विवाहित सपना शिवा वाघमारे (४०) या आजारी असल्याने चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात २४ मे रोजी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची आई सुमन गोवर्धन जुमनाके (६०) सोबत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील अमराई वॉर्ड क्रमांक १ मधील विवाहित सपना शिवा वाघमारे (४०) या आजारी असल्याने चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात २४ मे रोजी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची आई सुमन गोवर्धन जुमनाके (६०) सोबत होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना रूम क्र. ९ मध्ये दाखल करून घेतले. मात्र दोन दिवसानंतर वृद्ध आईसह महिला रूग्ण बेपत्ता झाली. याबाबत मंगळवारी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
घुग्घुस येथील सपना वाघमारे यांना दुर्धर आजार असल्याने तिची आई सुमन जुमनाके यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने २४ मे रोजी रात्री ८.५० ला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रूम नं. ९ मध्ये दाखल केले. दोन दिवसानंतर रूग्ण महिलेचे वडील गोवर्धन जुमनाके यांनी पैशाची जुळवाजुळव करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले असता, मुलगी व पत्नी बेपत्ता असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी संपूर्ण रुग्णालय पिंजून काढला. मात्र दोघींचाही थांगपत्ता लागला नाही.
रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, कुणीही काही सांगण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी रूग्णालयातील पोलीस चौकीत जाऊन प्रकरणाची माहिती दिली. मात्र पोलीस चौकीतील उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांना नागपूरच्या रूग्णालयात शोधा, घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असा अफलातून सल्ला दिला. हवालदिल झालेले अशिक्षित वडील गोवर्धन जुमनाके यांनी चंद्रपूर, बल्लारपूर या परिसरातील नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र दोघींचाही काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे येथील कामगार नेते सैय्यद अनवर यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यांनी जुमनाके यांना घेऊन घुग्घुस पोलीस ठाणे गाठले. मात्र सदर घटना चंद्रपूर शहरातील असल्याने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असे ठाणेदाराने सांगितले. यावरून जुमनाके यांनी मंगळवारी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मुलगी व पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली आहे.
याबाबत मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता एस. एस. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रकरणाची माहिती कानावर आली असून बुधवारी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले. निवासी वैद्यकीय अधिकारी मुनघाटे यांना विचारणा केली असता, रूग्णालय मेडिकल कॉलेजला हस्तांतरीत केल्यामुळे आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. तर जिल्हा शल्य चिकीत्सक राठोड यांनीही मेडिकल कॉलेजशी संपर्क साधावा, असे सांगितले.
रूग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा
महिला रूग्ण गंभीर आजारी असल्याने ती चालू शकत नाही. तर तिची आई वयोवृद्ध असल्याने डोळ्याला दिसत नाही. त्यामुळे दोघीही रूग्णालयातून बेपत्ता झाल्याच कशा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. उपचार सुरू असलेला रूग्ण निघून जाते किंवा बेपत्ता होते. मात्र रूग्णालय व्यवस्थापनाला काहीच कसे माहित नसते, असे विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत.