Maharashra Election 2019 ; चंद्रपूरला देशातील मॉडेल जिल्हा बनवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:32+5:30
२००९ ते २०१४ या वर्षातील आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर सहा हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत तब्बल आठ हजार २९४ कोटी रूपये सिंचन प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. अनेक प्रकल्प या निधीतून मार्गी लावण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील ५ वर्षांत महायुतीच्या सरकारने दमदार कामगिरी करीत राज्य विकासाच्या बाबतीत आघाडीवर नेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले. विकास हेच भाजप सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे विचाराला व विकासाला नागरिकांनी मतदान करावे आणि महायुतीला सत्तेत आणावे, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मागील पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने राज्यात केलेल्या विकासाचा लेखाजोखा सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडला.
शेतीवर खर्च, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना झालेला फायदा, कर्जमाफी, सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची सुटका, सिंचन प्रकल्पावरील झालेला खर्च, ग्रामीण भागातील आवास योजना, सडक योजना, जलयुक्त शिवार, पांदण रस्ते, स्टार्टप योजना, वीज निर्मिती क्षमतेत वाढ, वन्यजिवांमुळे झालेल्या नुकसानीला वाढीव अर्थसहाय्य, राज्यातील वृक्ष लागवड अशा अनेक विकासकामांची यादीच सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दाखविली.
२००९ ते २०१४ या वर्षातील आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर सहा हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत तब्बल आठ हजार २९४ कोटी रूपये सिंचन प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. अनेक प्रकल्प या निधीतून मार्गी लावण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती दिली. राज्यातील एकूण २२ हजार ५९० गावांत जलयुक्त शिवारची सहा लाख ९ हजार १८ कामे पूर्ण केली. यासाठी सात हजार ६९२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला. आघाडी सरकारच्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरांसाठी ९५ हजारांचे अनुदान दिले जात होते. युती सरकारने दीड लाख केले. ३२ हजार ६२८ किमीचे पांदण रस्ते तयार केले. यासारख्या अनेक योजना भरपूर निधी देत योग्यरितीने राबविल्या, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार त्यांनी दिली.
यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिºहे, आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
बल्लारपूर ते नागपूर लोकल ट्रेन
पुढच्या पाच वर्षांच्या नियोजनात आम्ही बल्लारपूर ते नागपूर लोकल शटल टेÑन सुरू करून नागरिकांना स्वस्त दरात प्रवास उपलब्ध करणार आहोत. यात वेळ आणि पैशाहीची बचत पण होणार, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल
काँग्रेस-राकाँ नेते खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. सत्ता असताना त्यांना जे जमले नाही ते महायुतीच्या सरकारने करून दाखविले. २००९ मध्ये सुशिलकुमार शिंदे यांनी कर्ज माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर ते विसरले. आघाडी सरकारची कर्जमाफी शुद्ध धूळफेक होती. असत्य बोलण्याचा नोबेल पुरस्कार ठेवला तर त्याचे मानकरी काँग्रेस, राकाँचे नेतेच असतील, असाही टोला यावेळी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.