किशोर जोरगेवारांचा शरद पवार पक्षातला प्रवेश रखडला; धानोरकांच्या विरोधानंतर प्रश्न दिल्ली दरबारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:14 PM2024-10-24T16:14:55+5:302024-10-24T16:23:27+5:30
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाला विरोध केला आहे.
Kishor Jorgewar : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जोरगेवार यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे चंद्रपूर येथे महायुतीला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक किशोर जोरगेवार हे २३ तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते. मात्र आता आमदार किशोर जोरगेवार यांचा शरद पवारांच्या पक्षातील पक्षप्रवेश रखडला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधामुळे किशोर जोरगेवार यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही.
चंद्रपूर विधानसभेत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी जोरगेवार विजयी झाले होते. शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवतील असा अंदाज असताना अचानक त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र यावरुन वाद झाल्याने महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जोरगेवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश निश्चित केला होता. पण लोकसभेत भाजपचा प्रचार करणाऱ्या जोरगेवारांसाठी मते कशी मागायची असा सवाल करत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना विरोध केला आणि पक्षश्रेष्ठींकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर आता जोरगेवार यांचा शरद पवार गटातील प्रवेश थांबवण्यात आला आहे.
प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधामुळे आपला पक्षप्रवेश थांबला असल्याचे जोरगेवार यांनी म्हटलं आहे. "मला महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून २० दिवसांपूर्वी आमच्या पक्षाकडून तिकीट घेतले तर निवडून याल असे सांगितले होते. मी त्यांना हो म्हटलं होतं. महाविकास आघाडीचा उमेदवार होण्याची माझी इच्छा होती. पण माझा पक्ष प्रवेश थांबवण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे माझा पक्ष प्रवेश थांबला आहे," असं किशोर जोरगेवार म्हणाले.
"खासदार प्रतिभा धानोरकर यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ मी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये त्या स्पष्टपणे विरोध करताना दिसत आहेत. जोरगेवार यांनी पाच वर्षात कुठलेही काम केलं नसल्यामुळे त्यांना तिकीट देऊ नये असं त्या म्हणत आहेत. शरद पवार गटाकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विरोधामुळे हा तिढा दिल्ली दरबारी पाठवण्यात आला असून त्याचा निकाल कळवण्यात येईल असे शरद पवार गटाने सांगितले," असेही किशोर जोरगेवार म्हणाले.