Maharashtra Election 2019 ; येत्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्हा पाणीदार करणार - सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:32+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर व सदाभाऊ खोत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे केले आहे. यावेळीही राज्यात महायुतीचे सरकार येईल, यात तीळमात्र शंका पडित व विचारवंतांच्या मनात नाही. महिला बचतगटाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या ५० वर्षात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जेवढा निधी उपलब्ध झाला नाही, तेवढा निधी आम्ही या पाच वर्षाच्या काळात उपलब्ध केला. सिंचनाच्या क्षेत्रातसुध्दा या जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पुढील पाच वर्षात हा जिल्हा पाणीदार व्हावा यादृष्टीने आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार आहोत, असा ग्वाही देतानाच या निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिंपाइं-रासप महायुतीचे जिल्ह्यातील सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर व सदाभाऊ खोत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे केले आहे. यावेळीही राज्यात महायुतीचे सरकार येईल, यात तीळमात्र शंका पडित व विचारवंतांच्या मनात नाही. महिला बचतगटाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. हा जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर व्हावा यादृष्टीने आम्ही सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू, असे सांगत या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वासही भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथे शनिवारी भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नाना श्यामकुळे, अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, रिपाईचे सिध्दार्थ पथाडे, जयप्रकाश कांबळे, सुरेश पचारे, डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही निवडणूक विचारांची आहे, विकासाची आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ होईल, यात तिळमात्रही शंका नाही. गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यात विकासाची लक्षणीय कामे झाली. धानोरा, तेलवासा, आमडी या बॅरेजेसला मंजुरी मिळाली आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प पूर्ण झाला आहे.
सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘आवाज दो’ योजना
पुढील पाच वर्षात या जिल्ह्यातील १५ ही तालुके पाणीदार व्हावे, यासाठी बंधारे, कॅनल्सचे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पंतप्रधान आवास योजना या माध्यमातुन नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षात जिल्ह्यात एकही जण बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठे कॉटन क्लस्टंर उभारण्याचे आपले नियोजन आहे. पुढील पाच वर्षात आवाज दो ही योजना आपण सुरू करणार असून ज्या माध्यमातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचतील. प्रत्येक तालुक्यात स्टेडियमचे बांधकाम करण्यात येईल. मिशन शक्ती अंतर्गत सहा स्टेडियम बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. महाकाली मंदीर परिसर विकासासाठी ६५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक विकसित जिल्हा ठरावा, यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करू, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.