Maharashtra Election 2019 ; ब्रह्मपुरीत काँग्रेस-शिवसेनेत थेट लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:41+5:30
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रेस आणि शिवसेनेत दुरंगी लढतीची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात खरी लढत काँग्रेस आणि शिवसेनेतच असली तरी वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीमुळे चुरस कायम आहे.
या मतदार संघात एकूण ११ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येथे काँग्रेसकडून दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात संदीप गड्डमवार यांनी शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम, आम आदमी पार्टीकडून अॅड. पारोमिता गोस्वामी, बसपाकडून मुकुंदा मेश्राम, भाकपकडून विनोद झोडगे, संभाजी ब्रिगेडकडून जगदीश पिल्लारे या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे, अजय पांडव व विनय बांबोळे हे अपक्ष उमेदवारही दंड थोपटून आहेत. गेल्या १३ दिवसांच्या काळात सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असला तरी यामध्ये काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व आपच्या उमेदवारांचा प्रचार आघाडीवर आहे. काँग्रेसचे उमेदवार वडेट्टीवार यांची मतदार संघावर मजबूत पकड असून ते गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षात असतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला हे मतदारांना पटवून देत आहेत. या भागात शेतकऱ्यांना सिंचनासाठी गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध करून दिले ही बाब त्यांची बाजू भक्कम करणारी ठरत आहे. शिवसेनेचे उमेदवार गड्डमवार यांच्याकडे विकासाचा कोणताही महत्त्वपूर्ण मुद्दा नाही. सहानुभुतीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांचा अधिकतम प्रभाव सावली तालुक्यात आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दल भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. भाजपची नाराज मते आपल्या पारड्यात टाकण्यात त्यांना कितपत यश येते यावरही बरेच काही अवलंबून आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रेस आणि शिवसेनेत दुरंगी लढतीची शक्यता आहे. आप आणि वंचित बहुजन आघाडीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.