Maharashtra Election 2019 : वडेट्टीवारांच्या विरोधात आयात उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:01 AM2019-10-12T04:01:58+5:302019-10-12T04:05:02+5:30
भाजपच्या तिकिटासाठी मुंबईच्या वाऱ्यांमध्ये गुंतून असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी भाजप नेत्यांचे उंबरठे झिजविणे सोडून मातोश्रीचे द्वार ठोठावले.
- राजेश भोजेकर
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार निवडणूक लढणार हे निश्चित होते. यामुळे सत्ताधारी भाजप हे तगडे आव्हान कसे पेलते, या अनुषंगाने राज्याचे लक्ष या मतदार संघाकडे लागून होते. अखेरच्या क्षणी भाजपने महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सोडल्याने या मतदार संघाची चुरसच संपल्यागत स्थिती निर्माण झाली. भाजपकडे दोनदा आमदार राहिलेले प्रा. अतुल देशकर यांच्यासारखा स्वच्छ चेहरा होता. मात्र भाजपने त्यांच्यावर विश्वास न दाखविता अन्य जागेच्या मोबदल्यात ही जागा शिवसेनेच्या पदरात टाकली. या मतदार संघात शिवसेनेकडे नेतृत्वच नसल्यामुळे कार्यकर्ते दूरची गोष्ट. ही आयती संधी साधून भाजपच्या तिकिटासाठी मुंबईच्या वाऱ्यांमध्ये गुंतून असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी भाजप नेत्यांचे उंबरठे झिजविणे सोडून मातोश्रीचे द्वार ठोठावले. शिवसेनेकडेही चेहरा नसल्यामुळे गड्डमवारांना विना प्रयासाने ही तिकीट मिळाली. सत्ताधारी पक्षाकडून तिकिट मिळाल्याने गड्डमवार कामाला लागले आहेत. मात्र, वडेट्टीवारांचे आव्हान ते कसे पेलते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
जमेच्या बाजू
ब्रह्मपुरीतून पहिल्यांदाच आमदार होते. विरोधी पक्षात असताना अनेक विकासकामांसाठी निधी खेचून आणला. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई व्हाव्यात म्हणून अनेकदा निकरीचा लढा दिला. गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा तलावात आणले. ब्रह्मपुरी नगर परिषद, सिंदेवाही व सावली नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकविला. अनेक ग्रामपंचायतीही काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. लोकसभेत खासदारही पाठविला. जनतेशी दांडगा संपर्क.
उणे बाजू
गेल्या निवडणुकीत काही महत्त्वपूर्ण आश्वासने विजय वडेट्टीवार यांनी या मतदार संघातील जनतेला दिलेली होती. परंतु राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यामुळे त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाही. सावलीचा पाच वर्षांत चेहरामोहरा बदलविणार, साखर कारखाना उभारणार, बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी सावली व सिंदेवाहीत एमआयडीसीची मुहूर्तमेढ रोवणार ही आश्वासने अपूर्ण राहिली.