Maharashtra Election 2019 ; वडेट्टीवारांचे ब्रह्मपुरीत जोरदार शक्तीप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:26+5:30
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी दुपारी विरोधी पक्ष नेते तथा कॉंग्रेस - राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या महाआघाडीचे उमेदवार ...
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी दुपारी विरोधी पक्ष नेते तथा कॉंग्रेस - राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या महाआघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी रितसर आपले नामांकन राजीव गांधी सभागृहात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. यावेळी त्यांची जम्बो रॅली बघून ब्रह्मपुरीकर अवाक् झाले. सुमारे दहा हजार नागरिक या रॅलीत सहभागी झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता.
यावेळी त्यांच्यासोबत विलास विखार, राम मेश्राम, प्रमोद चिमूरकर आदी उपस्थित होते. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय वडेट्टीवार उपस्थित जनसमुदायासमोर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद आहे. ‘विजय’ला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण मागील ५ वर्षात या मतदार संघात केलेली विकासात्मक कामे, दीनदुबळ्यांची मी केलेली सेवा व जनतेसाठी दिलेला वेळ यावर माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. प्रकाश देवतळे, डॉ. झाडे, अशोक रामटेके, प्रा. राजेश कांबळे, दामोधर मिसार, यशवंत दिघोरे, रिता उराडे, गोविंद भेंडारकर, चित्रा डांगे, स्मिता पारधी आदींचीही यावेळी भाषणे झाली.
विजय वडेट्टीवार बैलबंडीवर स्वार
रॅलीदरम्यान विजय वडेट्टीवार हे सजविलेल्या बैलबंडीवर स्वार झाले होते. बैलबंडी केळीच्या पानांनी व विविध फुलांनी सजविली होती. स्वत: विजय वडेट्टीवार बैलबंडीवर उभे राहून जनतेला अभिवादन करीत होते. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी ब्रह्मपुरी शहर व तालुक्यासह सावली, सिंदेवाही तालुक्यातील हजारो कार्यकर्ते दाखल झाले होते.
एकाच रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला ठरल्या आकर्षण
उमेदवारी अर्ज ते सभा व रॅलीमध्ये विविध तालुका व शहरातील महिला, किरण वडेट्टीवार, शिवाणी वडेट्टीवार यांच्यासह हजारो महिलांनी एकाच रंगाची साडी परिधान केल्याने रॅलीत त्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरल्या होत्या.