Maharashtra Election 2019 ; विजय वडेट्टीवारांच्या रॅलीची ब्रह्मपुरी क्षेत्रात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:40+5:30
विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर करणार याकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीत नागरिकांनी हजारोच्या संख्येने स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार हे येथून दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली लक्षवेधक मिरवणूक विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय ठरली आहे. गावागावांतील हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. आपल्यावरील प्रेमामुळेच कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मिरवणुकीत सहभागी झाल्याचे मत काँग्रेसचे ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर करणार याकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीत नागरिकांनी हजारोच्या संख्येने स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. मिरवणुकीत विधानसभा क्षेत्रातील सावली, सिंदेवाहीपासून ब्रह्मपुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी करायला सुरूवात केली होती.
३ ऑक्टोबर हा दिवस ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रचार सभांच्या इतिहासातील अभूतपूर्व गर्दीचा दिवस ठरला. मिरवणुकीत युवक, युवती, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले. विजय वडेट्टीवार यांचा शहरी तसेच ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे. प्रत्येक गावात त्यांचा चाहता वर्ग असल्यामुळेच त्यांच्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे मत ब्रह्मपुरीतील नागरिकांनी व्यक्त केले. सावली तालुक्यातील सावली, व्याहाड, चकपिरंजी, हंरबा, बोथली, व्याहाड खुर्द, व्याहाड बु., उपरी, सामदा, निमगाव, निफंद्रा, गेवरा या गावांसह सिंदेवाही तालुक्यातील राजोली, पळसगाव जाट, रत्नापूर, नवरगाव आदी तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडीसह कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते, पदाधिकारी या मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.