Maharashtra Election 2019 ; मतदारराजा आज देणार महाकौल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 06:00 AM2019-10-21T06:00:00+5:302019-10-21T06:00:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क । चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, चिमूर, राजुरा व ब्रह्मपुरी या सहा विधानसभा निवडणुकीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क । चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, चिमूर, राजुरा व ब्रह्मपुरी या सहा विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार दि. २१ ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातून एकूण ७१ उमेदवार नशीब अजमावत आहेत. यात विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, अॅड. संजय धोटे, नाना श्यामकुळे यांच्यासह किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर आणि रमेश राजूरकर या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून ६ वाजता मतदान पूर्ण होईल. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी चोख बंदोबस्त आहे.
कडेकोट बंदोबस्त
४, ४६६ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त व सुरक्षेकरिता तैनात केले आहे. यामध्ये १९५ पोलीस अधिकारी, दोन हजार ३८० पोलीस कर्मचारी, सात अर्धसैनिक दल, एक हजार २०० होमगार्ड, सी ६० दंगा नियंत्रण पथकाचा समावेश आहे.
मतदान करण्यासोबतच घ्या सेल्फीचाही आनंद
मतदान केल्याच्या समाधानासोबतच मतदारांना सेल्फीचाही आनंद घेता यावा. याकरिता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील तब्बल २६ मतदान केंद्रांवर सेल्फी पॉर्इंट विकसित करण्यात आले आहे. याचा नागरिकांना लाभ घ्यावा.
गडबड झाल्यास शिघ्र कृती दल तैनात
शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. संपूर्ण जिल्ह्यासाठी असे एक वेगळे दल पोलीस प्रशासनाने तैनात ठेवले आहे. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करेल.
मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर
जिल्ह्यातील खासगी आस्थापनांच्या कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे निर्देश सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या दिवशी जिल्ह्यातील दुकाने, कारखाने, निवासी हॉटेल, खाद्यगृह, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रमे, बांधकाम कामगार, घरेलू कामगार किंवा इतर आस्थापना यामध्ये कार्यरत असलेल्या मतदारांनानिवडणुकीच्या दिवशी भरपगारी सुटी देणे बंधनकारक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणे शक्य नसेल मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्याकरिता किमान दोन ते ती तासाची भरपगारी सवलत द्यावी, असेही निर्देश दिले आहेत.
मतदारांसाठी २७२९ व्हीव्हीपॅट
विधानभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी दोन हजार ७२९ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपरऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदानानंतर सात सेकंदांपर्यंत मत कुणाला दिले, हे अवलोकता येणार आहे. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. यामुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
ईव्हीएम बिघडल्यास पर्यायी व्यवस्था सज्ज
ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यासाठी ५३७ व्हीव्हीपॅट, ३७६ कंट्रोल युनिट तर ४०० बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. संबंधित विधानसभेच्या मुख्यालयी त्या ठेवल्या आहेत.