Maharashtra Election 2019 ; विजयाची हॅटट्रीक : पाच वर्षातील पायाभूत विकासकामे जनतेला भावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:43 AM2019-10-25T01:43:50+5:302019-10-25T01:44:04+5:30
सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासकामांची मालिकाच सुरू केली. दूरदृष्टी ठेवत बेरोजगारीवर मात करण्यासाठी विविध लघु उद्योगांना चालना दिली. कोट्यवधींचा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दिला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डायमंड कटींग प्रशिक्षण सेंटर, सैनिकी स्कूल, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ठिकठिकाणी इको पार्क यासारखी शहराचा चेहरामोहरा बदलविणारी कामे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : विद्यमान अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार म्हणून रिंगणात होते. ते विजयी होतील, असे चित्र प्रचारादरम्यानच स्पष्ट होते. झालेही तसेच. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडे यांचा ३२ हजार ८५८ मतांनी पराभव केला.
सुधीर मुनगंटीवार यांना ८५, २०४ मते मिळाली तर डॉ. विश्वास झाडे यांना ५२,३४६ मते पडली. तर वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे हे ३९,३८२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासकामांची मालिकाच सुरू केली. दूरदृष्टी ठेवत बेरोजगारीवर मात करण्यासाठी विविध लघु उद्योगांना चालना दिली. कोट्यवधींचा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दिला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डायमंड कटींग प्रशिक्षण सेंटर, सैनिकी स्कूल, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ठिकठिकाणी इको पार्क यासारखी शहराचा चेहरामोहरा बदलविणारी कामे केली. याशिवाय सिंचन, उद्योग, पाणी पुरवठा यासाठीही भरपूर निधी दिला. त्यांच्या या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये ते लोकप्रिय होते. काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे हे मतदारांसाठी नवखे होते. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतांवरच त्यांना समाधान मानावे लागले. वंचितचे राजू झोडे हेदेखील मतदारांवर फारसा प्रभाव पाडू शकले नाही. अखेरच्या फेरीनंतर मुनगंटीवार यांना ३२ हजार ८५८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
85,204मिळाली मते
विजयाची तीन कारणे...
1दूरदृष्टी असलेला नेता. मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विकासकामात स्वत:ला झोकून दिले. चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले. लहान-लहान उद्योगांतून महिलांना आत्मनिर्भर बनविले. बचतगटाची चळवळ निर्माण केली.
2मतदार संघात दांडगा जनसंपर्क. कुणाच्याही हाके ओ देऊन त्याच्या समस्यांचे निराकरण करणे.
3भाजपची पारंपारिक मते कायम जुळवून ठेवली. कार्यकर्त्यांशी आपुलकीची वागणूक.