चंद्रपूर निवडणूक निकाल; कष्टाची झाली फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:58 IST2019-10-24T18:56:56+5:302019-10-24T18:58:23+5:30
Chandrapur Election Results 2019; Kishor Jorgewar किशोर जोरगेवार यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाही

चंद्रपूर निवडणूक निकाल; कष्टाची झाली फुले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा किशोर जोरगेवार अपक्ष म्हणून ७५ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाला. आपल्या लेकराचे हे यश डोळ्यात साठविण्यासाठी जोरगेवार यांची आई गर्दीतून वाट काढत त्यांच्या जवळ आली. यावेळी किशोर जोरगेवार यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाही. हे बघून आईनेही आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती जवळ येताच आमदार झालेल्या या मुलाने आईचा मुका घेऊन तिला कवटाळले. नंतर किशोर जोरगेवार यांनी आपल्या गळ्यात कार्यकर्त्यांनी घातलेल्या पुष्पमाळा काढून चक्क आईच्या गळ्यात घातल्या. हे भावनिक दृश्य उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते. तिकडे आवाराच्या बाहेर हजारो कार्यकर्ते बिगुल वाजवून आनंदोत्सव साजरा करीत होते. त्यांना किशोर जोरगेवार यांची विजयी भावमुद्रा बघायची होती. जोरगेवारांनी त्यांच्यासाठी कसलाही विचार न करता थेट लोखंडी दारावर चढले. आणि कार्यकर्त्यांना हात जोडून अभिवादन केले. जोरगेवारांच्या या धाडसाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.