महात्मा गांधी जयंती ‘नई तालीम’ दिन म्हणून होणार साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 03:55 PM2019-09-30T15:55:20+5:302019-09-30T15:57:23+5:30
महात्मा गांधी यांचे १५० वे जयंतीवर्ष सर्वत्र साजरे करण्यात येत असतानाच यावर्षी शाळा, विद्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंती ‘नई तालीम’ दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा गांधी यांचे १५० वे जयंतीवर्ष सर्वत्र साजरे करण्यात येत असतानाच यावर्षी शाळा, विद्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंती ‘नई तालीम’ दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम विशेष करून मुलउद्योगी शिक्षणासंदर्भात चर्चा, स्थानिक कारागीर शेतकऱ्यांंचा सत्कार, स्वच्छता, घरगुती उपकरणांची देखभाल आदींबाबत विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक डॉ.अशोक भोसले यांनी सर्व शाळांना तसे निर्देश दिले आहे.
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद हैद्राबाद या संस्थेने महात्मा गांधी जयंतीनिमित्त नई तालीम कार्य शिक्षण, अनुभवाधारित अध्ययनाबाबत विविध उपक्रम राज्यातील सर्व शाळा, अध्यापक विद्यालय व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थांमध्ये राबविण्याचे परिपत्रक काढले आहे. २ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० हा कालावधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० जयंतीवर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्ताने मुख्याध्यापकांनी शाळांमधील सर्व सहकाऱ्यांची सभा घेऊन नई तालीम मूलउद्योगी शिबिराबाबत चर्चा करावी, स्थानिक कारागीर, दुकानदार, शेतकऱ्यांचा शालेय परिपाठानंतर सत्कार करावा, असेही आदेश देण्यात आले आहे.
असे आहे स्वरूप
स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन करून स्वच्छतागृहाची स्वच्छता व स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन करावे, स्थानिक परिसरातील वनस्पती, फळझाडे यांच्या बियांचे संकलन, शालेय परिसरात वनस्पतीचे संवर्धन व वनस्पतीवाढीचे निरीक्षण करावे, सायकल, कुकर, मिक्सर आदी साहित्याच्या वापराबाबत दिग्दर्शन व देखभाल करणे, स्कू ड्राईवर, कुलूप-किल्ली, पान्हे, कात्री आदींच्या वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे यासोबतच प्रथमोपचार पेटी वापरण्याबाबत प्रात्याक्षिक तसेच सराव करावा, स्थानिक लघुउद्योगासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती गोळा करायला सांगावे तसेच त्यांना याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.