महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 07:00 AM2020-03-07T07:00:00+5:302020-03-07T07:00:04+5:30
सर्वसामान्य रुग्णालयांना आधारवड ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती राज्य सरकार वाढवणार आहे.
राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वसामान्य रुग्णालयांना आधारवड ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती राज्य सरकार वाढवणार आहे. आता प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय योजनेत सहभागी केले जाणार आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने त्यादृष्टीने पावले उचचली आहेत. योजनेत राज्यातील रुग्णालयांची संख्या दुप्पट करून रुग्ण सेवा अधिकच सक्षम करण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.
जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी आता रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात ४९२ रुग्णालये सहभागी आहेत. यात ३५५ तालुक्यांपैकी १०० तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांतील रुग्णांना या योजनेद्वारे उपचार घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा लगतच्या तालुक्यामध्ये जावे लागते.
उपचारासाठी रुग्णांना करावी लागणारी पायपीट, आर्थिक खर्च, वेळेत उपचाराच्या दृष्टीने त्यांना त्यांच्याच तालुक्याच्या ठिकाणी उपचार घेता यावेत, यासाठी प्रत्येक तालुक्यात योजनेंतर्गत एका रुग्णालयाचा समावेश केला जाणार आहे. योजनेसाठी असलेल्या निकषानुसार रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील तालुक्यांमध्ये रुग्णालयांचा समावेश करताना गरज भासल्यास प्रसंगी निकष शिथिल केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, उपचार वेळेत मिळाले नाहीत म्हणून रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी दिल्ली येथील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर राज्यात हेल्थ वेलनेस सेंटर सुरू केली जाणार आहेत. या माध्यमातून प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत. डॉक्टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता करून रुग्णांवर त्यांच्या जवळच्या रुग्णालयात उपचार दिले जाणार आहेत. गरज भासल्यास त्यासाठी खासगी डॉक्टरांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ९७१ आजारांवर इलाज केला जात आहे.