Mahavitaran Strike | जिल्ह्यातील साडेआठ हजार वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:31 AM2023-01-04T10:31:27+5:302023-01-04T10:33:57+5:30

खासगीकरणाला विरोध : सर्व संघटना एकवटल्या

Mahavitaran workers in chandrapur district are on strike from midnight against privatization | Mahavitaran Strike | जिल्ह्यातील साडेआठ हजार वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

Mahavitaran Strike | जिल्ह्यातील साडेआठ हजार वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

Next

चंद्रपूर : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला नष्ट करण्यासाठी या कंपनीला समांतर अशी अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवानगीसाठी अर्ज केला आहे. सरकारने मंजुरी दिल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होईल. वीज वितरण कंपनी फायद्यात असताना ती तोट्यात जाऊन बंद पडू शकते, असा आरोप वीज कर्मचाऱ्यांनी केला असून, ४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून महावितरण, महापारेशन आणि महाजनकोच्या कर्मचारी संघटना संपावर जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

अदानी इलेक्ट्रिक कंपनी समांतर वीजपुरवठा करू लागली तर ज्या पद्धतीने शासकीय दूरसंचार विभाग नष्ट झाला तीच वेळ महावितरणवर येऊ शकते, असा आरोपही संघटनांनी केला आहे. असे होऊ नये यासाठी व्यवस्थापनाशी २ जानेवारी २०२३ रोजी ऊर्जा सचिव व तीनही कंपनीच्या व्यवस्थापक आणि सर्व संघटना प्रतिनिधी यांची बोलणी फिसकटल्याने महाराष्ट्र राज्य कर्मचारी-अधिकारी अभियंता संघर्ष समिती व वीज कर्मचारी संयुक्त कृती समिती सीएसटीपीएस ऊर्जानगरच्या वतीने द्वारसभा घेण्यात आली. ४ जानेवारीच्या रात्रीपासून ७२ तासांचा संप सुरू करण्यात येईल, असा इशारा कृती समितीचे संयोजक देवराव कोंडेकर, अमोल मोंढे यांनी दिला आहे.

अखंडित वीजपुरवठा करण्याची महावितरणची तयारी

महावितरण कंपनीच्या परिमंडलातील कार्यक्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवानगीच्या विरोधात वीज कामगार संघटनांनी बुधवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण सज्ज असल्याचा दावा महावितरण प्रशासनाने केला आहे.

बडतर्फ करण्याचे निर्देश

महावितरणतर्फे नियुक्त केलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत, अशा एजन्सीना बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकता असेल तिथे मंगळवारी साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

येथे करा संपर्क

वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. १८००-२१२-३४३५ यावर संपर्क साधावा.

संपात सहभागी संघटना

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कर्मचारी अभियंता सेना युनियन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटक, ग्रॅज्युएट इंजिनीअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी, संघटना, युनियन वर्कर्स फेडरेशन.

असे आहेत कर्मचारी

  • महापारेशन - ३००
  • महावितरण - १९००
  • महाजनको - ६३५०

(नियमित, कंत्राटी)

Web Title: Mahavitaran workers in chandrapur district are on strike from midnight against privatization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.