आरक्षणामुळे मूल नगर पालिकेत येणार महिलाराज

By Admin | Published: October 17, 2016 12:46 AM2016-10-17T00:46:02+5:302016-10-17T00:46:02+5:30

मूल नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुक पुरुष मंडळींचा चांगलाच हिरमोड झाला

Mahilaraja will come to the original city municipality due to reservation | आरक्षणामुळे मूल नगर पालिकेत येणार महिलाराज

आरक्षणामुळे मूल नगर पालिकेत येणार महिलाराज

googlenewsNext

राजकीय मोर्चेबांधणी : नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांचा शोध
मूल : मूल नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुक पुरुष मंडळींचा चांगलाच हिरमोड झाला आहे. अनेकांनी आपल्या अर्धांगिनींना पुढे करण्याचा विचार केला आहे. तर काही महिला स्वत:हूनच राजकीय रणांगणात उडी घेऊन या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वच निवडणूकीकरिता राजकीयदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या मूल नगर परिषदेची आगामी निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असे निश्चित झाले होते. त्यानुसार मूल नगरातील सत्ताधारी भाजपा पक्षातील दिग्गज उमेदवार मलाच नगराध्यक्षाची तिकीट मिळणार म्हणून निवडणूकीच्या तयारीला लागले होते. विरोधी बाकावरुन सत्ताधाऱ्यांना सभेमध्ये जेरीस आणणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनीही आगामी निवडणुकीचे सुखद स्वप्न पाहणे सुरु केले होते. एवढेच नव्हेतर सत्तापक्षातील नगरसेवकांचे मतभेद व विकासातील निष्क्रियता चव्हाट्यावर आणणे सुरु केले होते. परंतु थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीचे आरक्षण उशिरा जाहीर झाल्याने शर्यतीत असलेल्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते आता आपल्या अर्धांगिनींना पुढे करणार काय, अशी चर्चा मूल नगरात रंगायला लागली आहे.
थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला संवर्गाकरिता आरक्षित असल्याने रिंगणात कोणत्याही जातीधर्माची महिला रिंगणात उतरु शकते. यासाठी सत्ताधारी भाजपानेही उमेदवार शोधणे सुरु केले असून उमेदवारीचा अंतीम चेंडू जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती राहणार आहे. तर विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस पक्षानेही नगराध्यक्ष पदावर कोण उमेदवार पुढे येणार, याची चाचपणी सुरु केली असून काँग्रेसच्या उमेदवारांची धूरा काँग्रेसचे युवा नेते चंद्रपूर जि.प.चे माजी अध्यक्ष तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संतोष रावत यांच्याच खांद्यावर राहील असेही बोलले जात आहे. कारण रावत यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने आपले बहुमत नुकतेच सिद्ध केले आहे. काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष तयारीनिशी उतरत असले तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय यांनीसुद्धा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन उमेदवार शोधणे सुरु केले आहे. मागील पाच वर्षात भाजपाच्या हातात सत्तासुत्रे होती. सक्षम नेतृत्वही ना. सुधीर मुनगंटीवार यांचे होते आणि नगराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार मूल नगर विकासाच्या मार्गावर धावायला पाहिजे होते. परंतु बहुमतात असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांचे ढिसूळ नियोजन विकासाला बाधा निर्माण करीत राहिले, हे चित्र प्रत्यक्ष मूल नगरातील जनतेने अनुभवले आहे. म्हणून मूलची जनताही यंदा कुणावर विश्वास ठेवते, हे प्रत्यक्ष निवडणुकीतच कळणार आहे. भाजपाला निष्क्रीय ठरवत त्याचाच फायदा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न हवा तसा यशस्वी ठरला नाही. परंतु निवडणुक प्रचार कार्यात सत्ताधाऱ्यांचे काही मुद्दे बाहेर निघू शकतात. त्यामुळे सत्ता पक्षातील जुन्या नगरसेवकांवर भाऊंचा विश्वास किती राहणार आणि कोणाला रिंगणात ठेवणार, हे येणारी वेळच सांगणार आहे. परंतु बहुतेक नवीन उमेदवार देणार, अशी चर्चा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. नगराध्यक्षांची थेट निवडणूक असल्याने निवडणुकीच्या रिंगणात पुढे येणारे सर्वच पक्षातील कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Mahilaraja will come to the original city municipality due to reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.