पालकमंत्र्यांमुळे बल्लारपूर शहर विकासात अग्रस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:11 AM2017-11-20T00:11:43+5:302017-11-20T00:12:33+5:30
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची विविध कामे मार्गी लागली आहेत.
बल्लारपूर : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची विविध कामे मार्गी लागली आहेत. मोठया प्रमाणावर निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी खेचून आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यांच्या रुपाने खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला विकासपुरूष लाभले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी व्यक्त केली.
बल्लारपूर शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाच्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर तलाठी कार्यालयाच्या वास्तूचे लोकार्पण वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष हरिष शर्मा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विकास अहीर, भाजपाचे बल्लारपूर शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, सरचिटणीस मनिष पांडे, भाजपा नेते शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, राजू दारी, समीर केणे, देवेंद्र वाटकर, संजय मुप्पीडवार, आशिष देवतळे, कांता ढोके, वैशाली जोशी, सारिका कनकम, पुनम मोडक, आशा संगिडवार, सुमनसिंह, महेंद्र ढोके आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा म्हणाले, बल्लारपूर शहराच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उराशी बाळगला आहे. त्यांच्या विकासाच्या संकल्पाला अनुसरून आम्ही ही विकास प्रक्रिया जनतेच्या शुभेच्छा व आशिर्वादसह पुढे नेऊ असे शर्मा म्हणाले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.