योजना राबविण्यापूर्वी जनजागृती करा
By admin | Published: February 12, 2017 12:40 AM2017-02-12T00:40:53+5:302017-02-12T00:40:53+5:30
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरिता केंद्र सरकारच्या वतीने आम आदमी योजना सुरू करण्यात आली.
शेतकऱ्यांची मागणी : योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही
चंद्रपूर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरिता केंद्र सरकारच्या वतीने आम आदमी योजना सुरू करण्यात आली. मात्र जनजागृतीच्या अभावी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे ही योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शासनाने योजना राबविण्यापूर्वी प्रभावी जनजागृती करावी, अशी मागणी आहे.
ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी शासनाने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळणार होती. परंतु जनजागृतीचा अभाव व लाभार्थ्यांना माहिती देण्यास संबंधित कर्मचाऱ्यांची टाळाटाळ यामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिक या योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील आम आदमी केंद्र मानून शासनाने २००७ मध्ये आम आदमी विमा योजना सुरू केली. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील आम आदमी या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. सुरुवातीला या योजनेकरिता फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ८ जून २०११ रोजी शासनाने काढलेल्या एका नवीन अध्यादेशानुसार पाच एकरांपेक्षा कमी जिरायती व अडीच एकरांपेक्षा कमी बागायती शेतजमीन असलेली म्हणजेच अल्पभूधारक व्यक्तीही या योजनेची लाभार्थी होऊ शकते. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक अंगणवाडीसेविका यांच्याकडे देण्यात आली. या योजनेची बऱ्याच लोकांना माहितीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत ही योजना पोहोचलीच नाही. (शहर प्रतिनिधी)