‘हॅलो चांदा’चा अधिकाधिक वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:28 PM2018-10-02T22:28:31+5:302018-10-02T22:28:51+5:30
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी या दूरच्या गावापासून जिवती तालुक्यातील बाबापूर या टोकाच्या गावापर्यंत, चंद्रपूर महानगरापासून चिचपल्ली ग्रामपंचायतपर्यंत, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही काही तक्रारी असेल, त्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा अर्थात 'हॅलो चांदा 'ची सुरुवात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी या दूरच्या गावापासून जिवती तालुक्यातील बाबापूर या टोकाच्या गावापर्यंत, चंद्रपूर महानगरापासून चिचपल्ली ग्रामपंचायतपर्यंत, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही काही तक्रारी असेल, त्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा अर्थात 'हॅलो चांदा 'ची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचा वापर जोपर्यंत सामान्य नागरिक आपल्या मोबाईलमार्फत करणार नाही, तोपर्यंत ही योजना सक्षम होणार नाही, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग, वनविभाग, पंचायत समिती, नगरपंचायती, ग्रामपंचायत यासह शेताच्या मोजणीपासून तर तहसील कार्यालयातील कोणत्याही कामापर्यंत सामान्य नागरिकांची अडवणूक होत असेल, तर त्यासाठी ‘हॅलो चांदा’ ही नवी यंत्रणा संपूर्ण देशात पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये सुरू झाली आहे. १५५३९८ हा साधा सहा अक्षरी क्रमांक डायल करून सकाळी १० ते ५ या कार्यालयीन वेळेत आपली तक्रार नोंदवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी सहा हजार लोकांनी या यंत्रणेचा लाभ घेतला. या माध्यमातून शाळा समितीपासून अंगणवाडी सेविकापर्यंत आणि भूमिअभिलेख कार्यालयापासून सातबारा मिळण्याच्या सेतू केंद्राच्या समस्यांपर्यंत अनेक समस्यांची सोडवणूक करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बिलापासून तर महानगरपालिकेच्या कर वसुली विभागापर्यंत अनेक तक्रारी सोडविण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या यंत्रणेची दखल राज्य आणि देशपातळीवर घेण्यात आली आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.