कारागृहातील संग्रहालयाचा प्रस्ताव तयार करा
By Admin | Published: May 22, 2016 12:40 AM2016-05-22T00:40:01+5:302016-05-22T00:40:01+5:30
चंद्रपूर जिल्हा कारागृहाला अन्यत्र स्थानांतरित करुन त्या ठिकाणी गोंडकालिन संग्रहालय स्थापन करण्यासाठी पुरातत्व विभागाने...
हंसराज अहीर यांच्या सूचना : महानगरातील पुरातनस्थळांची पाहणी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कारागृहाला अन्यत्र स्थानांतरित करुन त्या ठिकाणी गोंडकालिन संग्रहालय स्थापन करण्यासाठी पुरातत्व विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. चंद्रपूर महानगरातील पुरातन स्थळांची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. या विषयी ना.अहीर यांनी विश्रामगृह येथे बैठक घेतली.
स्थानिक विश्रामगृहात आयोजित बैठकीस चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, गोंडराजाचे वंशज विकासबाबा आत्राम, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या अधीक्षक नंदीनी भट्टाचार्य, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, अधिक्षक अभियंता बालपांडे, कार्यकारी अभियंता अशोक गाडेगोणे, महानगरपालिचे उपायुक्त रविंद्र इंगोले, अनिल फुलझेले, अंजली घोटेकर, देवानंद वाढई, रमणिकभाई चव्हाण, डॉ.गोपाल मुंदडा, प्रा.सचिन वझलवार, मोहन चौधरी, राजू घरोटे व संजय खनके आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहराचे पुरातनकालिन महत्व असलेले परकोट कायम ठेवून येथील वाहतुकीची कोंडी पर्यायी मार्ग म्हणून शहरात अंडरपास अथवा रोड ओवरब्रिज करण्यासाठी पुरातत्व विभाग आणि महानगरपालिका व स्थानिक प्रशासनाने यात पुढाकार घेवून तातडीने आराखडे तयार करुन त्यासाठी आवश्यक तांत्रिक मंजुरी प्राप्त करुन तातडीने शहराला पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यास पुढाकार घेण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शहराच्या परकोटाचे होत असलेले नुकसान थांबवून शहरातील संरक्षित स्मारकांच्या पुनरुध्दार करण्यासाठी तसेच संरक्षित स्मारकाच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामांची केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नागपूर अधिक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यांनी चंद्रपूर परकोटाच्या ढासळत्या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या चमुला प्रत्यक्ष नेवून संबंधित स्थानाची दखल घेवून तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय चंद्रपूर जिल्हा कारागृहातील प्राचिन गोंडराजा यांच्या राजमहालाची पाहणी करुन कारागृहाला अन्यत्र स्थलांतरित करुन येथे गोंडकालिन संग्रहालय स्थापन करण्याबाबत पुरातत्व विभागाने आवश्यक प्रस्ताव तयार करुन त्यावर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. चंद्रपूर येथील अंचलेश्वर मंदिराच्या पुरातत्व विभागातर्फे सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन त्यांनी याबाबत आवश्यक सुचना दिल्या. (प्रतिनिधी)