कृषी उत्पादनात चंद्रपूर राज्यात अव्वल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:33 PM2018-12-28T22:33:30+5:302018-12-28T22:33:45+5:30
शिक्षण, प्रशिक्षण, उत्तम तांत्रिक साधनांची उपलब्धता व जगातील बदलत्या अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे विकले जाते ते पिकवायला शिकवा. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा निर्माण करण्यासाठी व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी पूर्ण शक्तीने पाठबळ दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षण, प्रशिक्षण, उत्तम तांत्रिक साधनांची उपलब्धता व जगातील बदलत्या अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे विकले जाते ते पिकवायला शिकवा. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा निर्माण करण्यासाठी व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी पूर्ण शक्तीने पाठबळ दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.
जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला वसंजीवनी देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते. या बैठकीला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु व्ही.एम. भाले, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा मनोदय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेच पाहिजे असा संकल्प केला असून त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये कृषी विद्यापीठातर्फे डॉ.प्रशांत शेंडे, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विद्यापीठातर्फे अनुक्रमे डॉ. सारिपुत लांडगे व शामकांत शेळके यांनी सुरुवातीला सादरीकरण केले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.देशपांडे, डॉ.अविनाश गोतमारे, शंकर किर्वे, जांभुळे आदिंनी सादरीकरण केले. जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या संस्था निर्मितीपेक्षा एकत्रित एकच संस्था निर्माण करून त्या माध्यमातून कोणत्याही मोसमामध्ये व कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक असणारी कृषी तंत्रज्ञानाची पूरक व्यवस्था निर्माण करण्याबाबत यावेळी निर्णय झाला. यासंदर्भात एकत्रित अशी जमीन शोधण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना सूचना केली.
पालकमंत्र्यांनी अशा दिल्या सूचना
जिल्ह्यामध्ये धान उत्पादक भाजीपाला निर्माते व अन्य किमान १० क्लस्टर तयार करण्यात यावे. किमान एक हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये शेती वाचनालय उघडण्यात यावे. क्रॉप पॅटर्न संदर्भात मार्गदर्शन करणारे केंद्र तयार व्हावे, जिल्ह्यातल्या सर्व पशुवैद्यकीय दवाखाने उत्तम करण्यासाठी विद्यापीठाने आदर्श वास्तुशिल्प व सुविधांची सूचना करावी. गोवंश वृद्धीसाठी विविध प्रजाती उपलब्ध कराव्यात. यासाठी जिल्हा प्रशासनाने जागेची उपलब्धता द्यावी. फूड सिक्युरिटी आर्मी तयार करण्यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करावी. विद्यापीठे व कृषी व्यवस्थेची पूरक असणाºया यंत्रणांमधील तज्ञांनी जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवीन सूचना द्याव्यात त्यासंदभार्तील अर्थसंकल्पीय तरतूद केली जाईल. तथापि जिल्ह्यातील शेतकºयांचा उत्कर्ष शाश्वत स्वरुपात यामधून साधल्या जावा, अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.