महाशिबिरासाठी गावनिहाय नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:01 PM2019-01-08T23:01:31+5:302019-01-08T23:01:55+5:30
मूल येथे शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरासाठी गावनिहाय नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये दिल्या. राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणात रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मूल येथे शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरासाठी गावनिहाय नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये दिल्या.
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणात रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या शिबिराचा आजपर्यंतच्या तयारीचा आढावा व पुढील काळातील तयारीचे, कामांचे नियोजन यासंबंधीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
बैठकीमध्ये आदिवासी विकास, समाज कल्याण, कृषी, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, वन, कौशल्य विकास, पोलीस, परिवहन, बँका व आर्थिक विकास महामंडळे आदी विभागांनी आजपर्यंत केलेल्या तयारीचा योजनानिहाय आढावा घेण्यात आला. याबाबत ४ डिसेंबर २०१८ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन आर. बोरकर, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ठरवलेल्या कामांपैकी किती कार्यवाही झाली याचा तपशील घेण्यात आला. यापुढे तसेच स्थानिक पातळीवर याचा समन्वय ठेवण्यासाठी मुलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून विभागनिहाय उपसमित्या स्थापन करण्याची सुचनासुद्धा त्यांनी दिल्या.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, आदिवासी विकास अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव किरण जाधव, मुलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार राजेश सरवदे, गटविकास अधिकारी अतुल भोसले व प्रदीप पांढरवळे, शासकीय विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठवडाभरात लाभार्थ्यांचा तपशील द्या
प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, आदिवासी व समाज कल्याण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधिकारी आदींनी गावनिहाय तसेच सेवा, योजनानिहाय नियोजन करून लाभार्थ्यांचा सविस्तर तपशील अहवाल पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी दिले.