काळ्या भुकटीने माखली ऊर्जानगर वस्ती
By admin | Published: December 10, 2015 01:25 AM2015-12-10T01:25:58+5:302015-12-10T01:25:58+5:30
ऊर्जानगर वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राच्या रोप वे मधून सतत कोळशाची काळी भुकटी उडत असते.
रोप वे बंद करण्याची मागणी : नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
अजिंक्य वाघमारे दुर्गापूर
ऊर्जानगर वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राच्या रोप वे मधून सतत कोळशाची काळी भुकटी उडत असते. त्यामुळे अख्खी वस्तीच काळ्या धुळीने माखली आहे. मानवास घातक या भुकटीचे येथील नागरिकांवर विपरीत परिणाम पडत असून त्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. वेळीच हा रोप वे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्र रोप वे द्वारे दुर्गापूर कोळशा खाणीतून कोळशाची उचल करीत आहे. वीज केंद्राच्या स्थापनेपासून ही यंत्रणा सुरू आहे. याच्या एका बाजुस कोंढी, वेंढली तर दुसऱ्या बाजुस नेरी वस्ती आहे. या वस्तीच्या मध्यभागून रोप वे वीज केंद्रात गेला आहे. या यंत्रणेद्वारे रोज शेकडो टन कोळसा वीज केंद्रात वाहुन नेल्या जातो. एवढ्या प्रचंड कोळशाची रोज हाताळणी होत असताना त्यातून निघणारे कोळशाचे सुक्ष्म धुलीकण वातावरणात पसरत आहेत.
पाणी फवारण्याच्या स्प्रींकलरप्रमाणे रोप वेतून भुकटीचा वर्षाव या वस्तीवर होतो. त्यामुळे येथील सारे रस्ते, घरांची छप्परे, आंगण आणि अख्खी वस्तीच काळ्या भुकटीने माखलेली आहे. येथील कुलूपबंद घरात तर काळ्या भुकटीचे थरावर थर साचलेले असतात. या भीषण जीवघेण्या प्रदूषणाने येथील नागरिक वैतागले आहेत.
येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या शरीरात श्वसनातून, खान्यापिन्यातून २४ ही तास या भुकटीचा शिरकाव सुरू असतो. सलग ३३ वर्षापासून नागरीक याचा सामना करीत आहेत. आता याचे दुष्परिणाम नागरिकांना जाणवू लागले आहेत. येथील अधिकत्तर नागरिकांना श्वसनासंबंधी गंभीर आजार जडल्याने नागरिकांचे आरोग्य खालवत चालले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करीत रोप वेवरून होणारी कोळशाची वाहतूक बंद करण्याची मागणी आहे.