वादग्रस्त सीमावर्ती गावात मलेरियाचा कोप
By admin | Published: October 2, 2015 05:49 AM2015-10-02T05:49:08+5:302015-10-02T05:49:08+5:30
जिवती तालुक्यातील वादग्रस्त सीमावर्ती गावांमध्ये सध्या मलेरियाचा कोप सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आधीच या गावांवर कोपली
संघरक्षित तावाडे ल्ल जिवती
जिवती तालुक्यातील वादग्रस्त सीमावर्ती गावांमध्ये सध्या मलेरियाचा कोप सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आधीच या गावांवर कोपली असताना हे नवे संकट गोरगरीबांच्या जिवावर उठले आहे. महाराष्ट्र- तेलंगाणा या दोन राज्याच्या कचाट्यात अडकलेल्या कोटा, शंकरलोधी, मुकदमगुडा व परमडोली या चारही गाववत हिवतापाने कहर घातला आहे. केवळ कहरच नाही तर या आठवड्यात एकूण चार जणांचा बळी गेला आहे.
महाराष्ट्र-तेलंगाणा या दोन राज्याच्या सीमावादात जिवती तालुक्यातील १४ गावे भरडली जात आहे. विकासाच्या दृष्टीने ही गावे उपेक्षितच आहेत. अशातच या १४ गावांपैकी कोटा, शंकरलोधी, मुकदमगुडा व परमडोली या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून हिवतापाची साथ सुरू आहे. अनेक रुग्ण हिवतापाने ग्रस्त असतानाही आरोग्य यंत्रणेला त्याचे काही सोयरसुतक दिसून आले नाही. याचा परिपाक म्हणून कोटा येथील मुद्रिकाबाई नारायण मोरे (२६) व दिगांबर नारायण गोपले (२५) यांचा मलेरियाने बळी गेला. शंकरलोधी येथील आशीद सुधाकर काटे या पाच वर्षाच्या बालकाचाही मलेरियानेच मृत्यू झाला. तर मुकदमगुडा येथील वर्ग दुसरीचा विद्यार्थी भिमजीत प्रकाश खंदारे याचाही याच आजाराने बळी घेतला. या आठ दिवसात परिसरातील चार जणांचा मलेरियाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. मुद्रिकाबाई नारायण मोरे ही विवाहित महिला असून तिला तीन लहान मुले आहेत. यापैकी एका केवळ सहा महिन्याचा आहे. या महिलेचे दोन मुलेही मलेरिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या उपचारासाठी ही महिला आदिलाबाद येथे गेली. मुलाची काळजी घेता घेता स्वत: दगावली. तर दिगांबर नागनाथ गोपले यालाही एक लहान मुलगी आहे. त्यांचा काल बुधवारी मृत्यू झाला. आजाराने बळी जात असल्याने भीतीचे वातावरण दिसून येत आहे. संपूर्ण गावामध्ये आणि परिसरातही तापाची साथ असून नागरिकही मोठ्या प्रमाणावर धास्तावलेले दिसत आहेत. (संबंधित वृत्त /४)
गावातील प्रत्येक कुटुंब आजाराने ग्रस्त
प्रस्तुत प्रतिनिधीने गावांना भेट दिली असता कोटा व शंकरलोधी या दोन्ही गावात प्रत्येक घरी सर्व व्यक्ती आजारी असल्याचे दिसते. कोणाला मलेरिया तर कोणाला विषमज्वराने (टायफाईड) ग्रासले आहे. लहानापासून तर वृध्दांपर्यंत सर्वच आजारी आहेत. मुकदमगुडा व परमडोली येथेही अनेकांना मलेरियाने ग्रासले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
कोटा हे गाव परमडोली तर शंकरलोधी हे गाव पुडियाल मोहदा ग्रामपंचायती अंतर्गत येते. पण येथील कर्मचारी गावाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विहिरीत किंवा बोरींगमध्ये ब्लिचींग पावडर टाकले जात नाही. ग्रामसेवक गावात येऊन कधीच समस्या जाणून घेत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.