गिलबिलीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मलेरिया
By admin | Published: November 29, 2014 01:00 AM2014-11-29T01:00:00+5:302014-11-29T01:00:00+5:30
तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मलेरिया या आजाराने ग्रासले आहे.
बल्लारपूर : तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मलेरिया या आजाराने ग्रासले आहे. यातील काहींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन स्वच्छतेबाबत किती जागरुक आहे, याचे चित्र ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवरुन दिसून येत आहे. या व्यतिरिक्त आणखी विद्यार्थी तापाने फणफणत आहे. आश्रमशाळेतील मलेरियाच्या प्रकोपाने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील गिलबीली येथील यशोधरादेवी आश्रमशाळा अनेक दिवसापासून सुरू आहे. या शाळेत तालुक्यातील गिलबिली, कोर्टीमत्ता, कारवा, इटोली, मानोरा आदी गावातील आदिवासी बालके शिक्षण घेत आहेत. २१ नोव्हेंबरपासून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना मलेरिया आजाराने ग्रासले आहे.
तापाने फणफणत असलेल्या विद्यार्थ्यांना कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी थातूरमातूर उपचार केला. मात्र काहीही उपयोग झाला नसल्याने पालकांनी व शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल ११ शालेय विद्यार्थ्यांना उपचारार्थ दाखल केले.
यातील एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कुंभारे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी बबलू आत्राम (११), बेबी पुंगारी (१३) , रुपेश पुंगारी (११) सर्व रा. गिलबिली या विद्यार्थ्यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले. तरीही आजघडीला येथील ग्रामीण रुग्णालयात गोपाल पोयाम (१२) रा. कोर्टीमत्ता, भूमिका चव्हाण (१०) रा. कारवा, राहुल सोयाम (१२) रा. कोर्टीमत्ता, शांतीकुमार गोमासे (१०) रा. कोर्टीमत्ता, रिंकू हिचामी (१२) रा. गिलबिली, सुशांती रिघा (७) रा. गिलबिली, ईश्वर पेलो (१२) रा. कोर्टीमत्ता आणि अंजणा ढुमणे (१०) रा. गिलबिली या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहे.
देशभरात स्वच्छता अभियानाचा सर्वस्तरावर डंगोरा पिटला जात आहे.ज्याठिकाणी विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी निवासी शाळेत भवितव्य घडविण्यासाठी येतात मात्र शाळाव्यवस्थापनाच्या गलथानामुळे विद्यार्थ्यांचे भावी जीवन कोमेजण्याच्या वाटेवर आले आहे. आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. या संदर्भात या शाळेचे मुख्याध्यापक बंडू पिपरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)