जिल्ह्यात कुपोषणाचे फेरसर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:14 AM2019-08-02T01:14:24+5:302019-08-02T01:15:13+5:30

भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धिमान होण्यासाठी कुपोषण निर्मुलन आवश्यक आहे. शासन विविध मार्गानी कुपोषण मुक्तीचा प्रयत्न करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचे पुर्नसर्वेक्षण करण्याच्या सुचना आपण संबंधित विभागाला दिल्या आहे.

Malnutrition re-surveyed in the district | जिल्ह्यात कुपोषणाचे फेरसर्वेक्षण

जिल्ह्यात कुपोषणाचे फेरसर्वेक्षण

Next
ठळक मुद्देनरेश गित्ते : सुदृढ समाजासाठी कुपोषण मुक्ती आवश्यक, विशेष मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धिमान होण्यासाठी कुपोषण निर्मुलन आवश्यक आहे. शासन विविध मार्गानी कुपोषण मुक्तीचा प्रयत्न करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचे पुर्नसर्वेक्षण करण्याच्या सुचना आपण संबंधित विभागाला दिल्या आहे. यावर आपण स्वत: लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राजमाता जिजाऊ आरोग्य अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात कुपोषण मुक्तीचा लढा उभारणारे डॉ. नरेश गिते यांनी भंडारा जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली. प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासोबतच भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि बुध्दीमान करण्यासाठी ते जिल्हाभरात विशेष प्रयत्न करणार आहे. भंडारा जिल्ह्यात कुपोषणाच्या तीव्र (सॅम) गटात ८२ तर मध्यम तीव्र (मॅम) गटात १२५ बालके आढळून आली आहेत. मात्र ही आकडेवारी समाधानकारक नाही. यापेक्षा दहापट मुले कुपोषणाच्या श्रेणीत असण्याची शक्यता आहे. त्यासाठीच आपण संपूर्ण यंत्रणेला मॅम व सॅम दोन्ही गटात कुपोषणाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात मॅम गटात चार ते पाच हजार मुले निघण्याची शक्यता आहे. या मुलांचा वाढीसाठी आणि विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. गिते यांनी सांगितले. नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असताना १७ हजार कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले. मानवी विकासावर खर्च करण्याची गरज आहे. यातून बाळाचे आयुष्य सुधारते. शिक्षणाची गुणवत्ता वाढते, असे सांगितले. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशन सारखे राबविण्यात येते. यातून देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कुपोषणाची समस्या कमी करण्याचा यातून प्रयत्न सुरु आहे.

कुपोषण म्हणजे काय?
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची स्थिती निर्माण होते. त्याला कुपोषण म्हणतात. त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल. कुपोषण म्हणजे आजार नव्हे. परंतु योग्य आहार, उपासमार व जीवनसत्वाचा अभाव याचा परिणाम मुलांचा शरीरावर होते. मुल लहानश्या आजाराने अशक्त दिसू लागते. बाळाची वाढ खुंटते. याला कुपोषण म्हणतात.

प्रती बालक दोन हजार मदत
कुपोषण मुक्तीसाठी प्रती बालक दोन हजार रुपये देण्याचे प्रयत्न प्रशासनाच्यावतीने केले जातील. ग्रामपंचायतीना चौदाव्या वित्त आयोगातून निधी प्राप्त होतो. त्यातील ठराविक निधी कुपोषणमुक्तीसाठी वापरण्याचा प्रयत्न आहे. दोन हजार रुपये अंगणवाडीताईंकडे देऊन एक हजार रुपये बालकांचा आहार आणि एक हजार रुपयांची औषधी त्यातून खरेदी केली जाईल. यावर सरपंचाचे अप्रत्यक्ष नियंत्रण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

पहिले हजार दिवस महत्त्वाचे
बाल्यावस्था हा मानवाचा वाढीचा व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. गरोदरपणात स्त्रियांना व जन्मानंतर बालकांना पहिल्या दोन वर्षात योग्य आहार न मिळाल्यास त्याचे दुरगामी परिणाम होतात. त्यामुळे गर्भधारणेपासून पहिले एक हजार दिवस म्हणजे जन्मानंतर २४ महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. जन्माला येणारे बाळ ४९ ते ५० सेंटीमीटरचे असावे, त्याचे वजन साधारणत: तीन किलो असले तर ते सुदृढ असते. कुपोषण मुख्यत: पहिल्या दोन वर्षातच निर्माण होते. परंतु अद्यापही लोकांना पहिल्या दोन वर्षातील आहाराचे महत्वच कळले नाही. गर्भावस्थेत मातेने सकस आहार घेतला पाहिजे. तसेच बाळालाही सकस आहार देण्याची गरज आहे, असे डॉ. गिते यांनी सांगितले.

Web Title: Malnutrition re-surveyed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.