बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:36+5:302021-07-16T04:20:36+5:30
वंचितचा आरोप : चौकशी करून दोषींवर कारवाई करा मूल : तालुक्यातील बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पूरक नळ ...
वंचितचा आरोप : चौकशी करून दोषींवर कारवाई करा
मूल : तालुक्यातील बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पूरक नळ पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये मंजूर झाली. पाण्याच्या टाकीचे बांधकाम चार वर्षे होऊनही अजूनपर्यंत बेंबाळ गावाला पाणीपुरवठा होत नाही. यासंबंधीची उच्चस्तरीय चौकशी करून लाखोंचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी वंचितचे नेते राजू झोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गावामध्ये एकूण पाण्याच्या तीन टाक्या असून एक पाण्याची टाकी जीर्णावस्थेत आहे तर सुस्थितीत असलेली टाकी कित्येक वर्षांपासून बंद आहे. सद्यस्थितीत गडीसुर्ला प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावातील काही भागातच पाणीपुरवठा होत असून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा पाणीपुरवठा केव्हा होणार, असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे. जवळपास या योजनेला सहा ते सात वर्षे होऊनही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत निवेदन देऊन गावकऱ्यांनी आंदोलनही केले होते. आंदोलनावेळी प्रशासनाकडून एका महिन्याच्या आत पाणी पुरवठा केला जाईल, असे लेखी आश्वासनही दिले होते. परंतु हे आश्वासन फोल ठरले आहे.
या कामासंबंधीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई केली नाही व पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू केला नाही तर या विरोधात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करणार, असा इशारा वंचित बहुजन आघाडीद्वारे देण्यात आला.
कोट
नळ कनेकशन न घेतल्यामुळे पाणी पुरवठा बंद : शाखा अभियंता गोर्लावार
बेंबाळ येथील बेघर वस्तीमधील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. दोनदा पाणी टाकी पण भरली. मात्र, नागरिकांनी नळ कनेक्शन घेतलेले नाही. यामुळे पाणी सोडायचे कुठे? म्हणूनच पाणी पुरवठा बंद आहे,
-सतीश गोर्लावर, शाखा अभियंता, पाणी पुरवठा विभाग.