मामा तलाव फुटला, 300 घरात शिरलं पाणी; तातडीने मदतकार्य पोहोचवा, मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
By राजेश भोजेकर | Published: July 21, 2024 05:22 PM2024-07-21T17:22:55+5:302024-07-21T17:24:30+5:30
चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चंद्रपूर : संपूर्णविदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. अश्यात चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे ६.३० वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले.
ना. मुनगंटीवार यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,’ असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.