ऊर्जानगरात साकारलं मामाचं गाव, "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ८ हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग

By राजेश भोजेकर | Published: January 14, 2024 07:04 PM2024-01-14T19:04:28+5:302024-01-14T19:04:50+5:30

मोठ्यांना बालपणीचा आनंद तर लहानांना निसर्गमय वातावरण लाभलं

Mama's village in Urjanagar, 8 thousand people participated in the "Happy Street" program | ऊर्जानगरात साकारलं मामाचं गाव, "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ८ हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग

ऊर्जानगरात साकारलं मामाचं गाव, "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ८ हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग

चंद्रपूर : उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या कि मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची, गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत, नात्यांची वीण अधिक घट्ट करायची अशी आपली मराठमोळी संस्कृती. मात्र धकाधकीच्या जीवनात ही जागा टी.व्ही.,मोबाईल, फेसबुक,व्होट्सअप सारख्या आभासी दुनियेने व्यापल्याने जीवनाचा खरा-खुरा आनंदच दूर झाला. मानवी जीवन तांत्रिक झाले, यातून उदयास आलेली शहरी संकल्पना म्हणजे "हॅप्पी स्ट्रीट". मामाच्या गावाला न जाता सुटीच्या दिवशी सकाळच्या प्रहरी मुख्य रस्त्यावरील रहदारी काही वेळापुरता इतरत्र वळवून त्याठिकाणी मनसोक्त खेळ, धमाल मस्ती करायची, हा यामागचा उद्देश.
 
महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ४० व्या वर्धापन दिना निमित्ताने ऊर्जानगर वसाहतीतील अधिकारी मनोरंजन केंद्रालगतच्या सभोवताली रस्त्यावर  "हॅप्पी स्ट्रीट" मामाचं गाव साकारण्यात आले. वीज केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः सुमारे ८ हजार व्यक्तींनी या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला.

हिरव्यागार वृक्षांच्या सावलीत, रंगबिरंगी फुगे, झेंडे, तोरणांनी रस्ते आकर्षक सजले होते. तर वयाचे भान विसरून, आपलं-परकं विसरून, प्रत्येकाने बालपणीच्या खेळाचा निखळ आनंद लुटला. नेहमी चारचाकी चालविणारा बैलबंडी चालवित होता तर माता-भगिनी आपल्या मुलांना विसरून टिक्कर बिल्ला, लगोरी, दोरीवरच्या उड्या, झुले,पाळणे,मामाचं पत्र हरवलं इत्यादी खेळांचा मनसोक्त आनंद घेत होत्या. चार तास कसे संपले कोणालाच कळाले नाही.

घराकडे परतीची पाउले वळायला तयार नव्हती एवढा जीव "हॅप्पी स्ट्रीट" मामाच्या गावाने लावला. एरवी घरात बोलायला वेळ नसणारी पालक मंडळी "हॅप्पी स्ट्रीट" वर एकमेकांशी खुलून बोलताना दिसली तर मुले-मुली देखील आपले आई-वडील टायर, लोखंडी रिंग चालवित धावत असल्याचे पाहून आश्चर्य चकित झाले.जात,पात,धर्म,वय,पद, गर्व दूर सारून प्रत्येक व्यक्ती स्वत:ला व्यक्त करीत नि:स्वार्थपणे सहभागी झाल्याचे दिसून येत होते. "हॅप्पी स्ट्रीट" च्या माध्यमातून अख्ख मामाचं गावच ऊर्जानगरात साकारण्यात आले होते. वडाच्या झाडालगत झोपडी निर्माण करुन गावाच्या वातावरणात भर पडली.

अखंडित वीज उत्पादनाचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या चंद्रपूर वीज केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी "हॅप्पी स्ट्रीट" हा उत्तम पर्याय असल्याचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार म्हणाले. या कौटुंबिक कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला त्याचे कारण लहान मुला-मुलींसाठी विविध खेळ, बक्षिसे, बुढ्ढी का बाल(शुगर कँन्डी), जादूचे प्रयोग, बंदुकीच्या गोळीने फुगे फोडणे, दोरीचे झुले,बैलगाडी,गाय-, बॉल गेम्स, सापशिडी, टायर, लोखंडी रिंग चालविणे, दोरीवरच्या उड्या,लहान सायकल, स्केटिंग, रांगोळी, चित्रकला तर तरुणी व महिलांसाठी मेहंदी, टॅटू, बॅडमिंटन, फुटबॉल,लगोरी, दोरीवरच्या उड्या, कंबर रिंग, प्लेट थ्रो, रबर रिंग, पुरुष वर्गासाठी फुटबॉल,प्लेट थ्रो, बॅडमिंटन, रेखाचित्र, कंचे, भवरे, ३६० डिग्री सेल्फी पॉईंट इत्यादी उपलब्ध होते. फूड झोनमध्ये इंडियन कॉफी हाउसचे खाद्यपदार्थ,,आईस्क्रीम, समोसा, आलूवडा,चहा, ,ढोकळा, मोमो, मोड कडधान्ये, भेळ, चना मसाला, पाणीपुरी, नारळपाणी, अश्या नानाविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासन,बुद्धिबळ, कॅरम, वृत्तपत्र,मासिके वाचन व झुम्बा डान्स थरार तर  दुसऱ्या मंचावर आदिवासी गोंडी नृत्य  ज्यामध्ये गाणे,नृत्य इत्यादी कला अनेकांनी  सादर केल्या. 
 
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांच्या मार्गदर्शनाखाली हॅप्पी स्ट्रीट आयोजन समितीच्या सहकार्याने "हॅप्पी स्ट्रीट" (मामाचं गाव) कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या संपन्न झाला.  

कार्यक्रमाला उप मुख्य अभियंते श्याम राठोड, अनिल पुनसे, प्रफुल्ल कुटेमाटे, डॉ.भूषण शिंदे, फनिंद्र नाखले, अधीक्षक अभियंते अशोक उमरे, डी.डब्ल्यू.सराग,डी.वाय.चौधरी,महेश ढोले, महेश पराते,राजेश डाखोळे, मनोज उमप, झिनत पठाण, सचिव रवींद्र चौधरी , सहसचिव राजेश आत्राम, दत्तात्रय पिंपळे, बाहुबली डोडल महाव्यवस्थापक, यशवंत मोहिते मुख्य जनसंपर्क अधिकारी,  उप महाव्यवस्थापक(मासं) हिना खय्याम, दिलीप वंजारी कल्याण अधिकारी, राणू कोपटे, सहा कल्याण अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक(सुरक्षा) अनुराग शुक्ला, उप मुख्य अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर ढूमने, विभाग प्रमुख, पुरुष-महिला मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नरेंद्र रहाटे  यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेत "हॅप्पी स्ट्रीट" आयोजन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच स्थापत्य, विद्युत, अग्निशमन, सुरक्षा तसेच सर्व विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Mama's village in Urjanagar, 8 thousand people participated in the "Happy Street" program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.