दोन चिमुकल्या मुलांना ठार करून पित्याची आत्महत्या; मन हेलावून टाकणारी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 12:25 PM2022-09-03T12:25:00+5:302022-09-03T15:33:02+5:30
मागील काही दिवसांपासून संजय हा आर्थिक विवंचनेत होता आणि त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची बाब समोर आली आहे.
वरोरा (चंद्रपूर) : येथे दोन चिमुकल्या मुलांना ठार करून पित्याने वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा येथे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वरोरा आणि गिरड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अस्मित (८) व मिस्टी (३) अशी मृत दोन चिमुकल्या मुलांची नावे आहेत. तर, संजय श्रीराम कांबळे (रा. बोर्डा) पित्याचे नाव आहे. संजय हा खासगी शिकवणी वर्ग चालवत होता, तर त्याची पत्नी ही शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला आहे.
शुक्रवारी मुलगा अस्मित हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजीकडे गेला होता. यावेळी संजयने त्याला घरी परत आणले, तर लहान मुलगी मिस्टी ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना घरात ठेवले. सायंकाळी मुलांची आई घरी आली असता, तिला दोन्ही मुले बिछान्यावर निपचित पडलेली दिसली. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि हालचाल बंद होती. तिने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मुलांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दोन चिमुकल्या भावंडांचा घरातच संशयास्पद मृत्यू, घटनेनंतर बाप फरार
या घटनेनंतर संजय कांबळे हा फरार होता. त्याचा भ्रमणध्वनीही बंद येत होता. संजयची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते. यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. संजय कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान संजयचा वर्धा जिल्ह्यात मृतदेह आढळून आला. संजयने हे पाऊल आर्थिक विवंचनेतून उचलले की त्यामागे अन्य काही कारणे होती, याचा शोध घेतला जात आहे.