बापरे बाप ! चक्क अंगावरूनच गेली चालक नसलेली बस, यांत्रिकीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 10:57 AM2022-05-17T10:57:35+5:302022-05-17T11:07:35+5:30
मूल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूरकडे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
मूल (चंद्रपूर) : येथील बसस्थानकामध्ये नादुरुस्त असलेली बस दुरुस्त करण्यासाठी चंद्रपूर डेपोतून आलेल्या बस यांत्रिकीच्या अंगावरून गेली. यात बस यांत्रिकी गंभीर जखमी झाला. लगेच मूल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूरकडे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
राजू दांडेकर (४५) असे मृत पावलेल्या बस यांत्रिकीचे नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. मूल येथील बसस्थानकावर एम.एच. -१४ एच.डी. ८२४३ या क्रमांकाची बस नादुरुस्त होती. या बसची दुरुस्ती करण्यासाठी चंद्रपूर डेपोतील बस यांत्रिकी राजू दांडेकर मूल येथे आले होते. बसची दुरुस्ती करण्यासाठी बस समोरच ते होते. अचानक उंच भागावर असलेली बस चक्क त्यांच्या अंगावर आल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र, प्राथमिक उपचार करून चंद्रपूरकडे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिवहन विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.