ब्रह्मपुरी तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला, मृतदेहाचे मिळाले तुकडे; महिनाभरात तिघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 02:33 PM2022-06-29T14:33:07+5:302022-06-29T18:05:10+5:30
ब्रम्हपुरी वनविभागात वाघाच्या हल्ल्यात मानवाचा बळी जाण्याच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. महिनाभरात तिघांचा बळी गेला आहे. त्याआधी दोघांचा बळी गेला आहे.
ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : जंगलालगत शौचास बसणे एकाच्या जीवावर बेतले. वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.
ताराचंद चंदनखेडे (५५, रा. भगवानपूर) हे डिझेल आणण्यासाठी ब्रम्हपुरीकडे जात होते. तुमडीमेंढा गावाजवळ जंगलालगत शौचास गेले असता, वाघाने हल्ला करून त्यांना जंगलात फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. रात्र होऊनही ते परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता, रस्त्यालगत दुचाकी तसेच फरफटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या. बुधवारी सकाळी वनविभागाने शोध घेतला असता, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले.
ब्रम्हपुरी वनविभागात वाघाच्या हल्ल्यात मानवाचा बळी जाण्याच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. महिनाभरात तिघांचा बळी गेला आहे. त्याआधी दोघांचा बळी गेला आहे. मंगळवारी भगवानपूर येथील रहिवासी ताराचंद चंदनखेडे शेतीचा हंगाम असल्याने सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी येथे जात होते. शौचास लागल्याने जंगलालगत गेले. त्याच वेळी वाघाने हल्ला करून त्यांना जंगलात फरफटत नेले असावे. उशिरापर्यंत ते परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता, सदर घटना निदर्शनास आली.
वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. रात्री उशीर झाल्याने वनविभागाने सकाळी शोध घेतला. कक्ष क्रमांक ८५८ मध्ये मृतकाचा पाय, हाताचा पंजा व मुंडके वेगळे केले होते, तर शरीराचा डाव्या बाजूचा भाग खाल्लेला आढळून आला. सर्व अवयव खाल्ले असल्याने वाघ एकापेक्षा जास्त संख्येत असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने त्यांच्या कुटुंबाला २० हजार रुपयांची तातडीची मदत दिली आहे.
कॅमेरे लावले
वनविभागाने या परिसरात कॅमेरे लावलेले आहेत. त्यातील फुटेज पाहून गुरुवारी दुपारपर्यंत वाघांची संख्या नेमकी किती होती, हे लक्षात येईल. सदर परिसरात वाघांचा वावर असल्याने नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.