तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार; नागभीड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 01:48 PM2022-05-05T13:48:23+5:302022-05-05T13:49:05+5:30
ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते.
नागभीड (चंद्रपूर) : कुटुंबासह तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या व्यक्तीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून एका व्यक्तीस जागीच ठार केले. ही घटना नागभीड तालुक्यातील नवेगाव ( हुंडेश्वरी ) येथे गुरुवारी सकाळी ७ च्या दरम्यान घडली. या घटनेने वनविभागात व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
आडकू मारोती गेडाम (६०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आडकू सकाळीच पत्नी, पुतण्या आणि मूलीसह तेंदूपत्ता संकलनासाठी गावानजीकच्या जंगलात गेला होता. तेंदूपत्ता संकलनात व्यस्त असतांना वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.
या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते. लगेच ही माहिती वनविभागास देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळ गाठून मोक्का पंचनामा केला आणि पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.