कंपनीच्या सर्वेक्षण कंत्राटात मनपाचे गौडबंगाल
By admin | Published: December 2, 2015 12:43 AM2015-12-02T00:43:30+5:302015-12-02T00:43:30+5:30
चंद्रपूर शहरातील स्थावर मालमत्तांच्या सर्वेक्षण करण्याचे काम दिलेल्या कंपनीचा अल्पकाळाचा अनुभव लक्षात घेता ..
आपचा आरोप : भरमसाठ करवाढीच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरणार
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील स्थावर मालमत्तांच्या सर्वेक्षण करण्याचे काम दिलेल्या कंपनीचा अल्पकाळाचा अनुभव लक्षात घेता या कंपनीला सर्वेेक्षणाचे काम देण्यात गौडबंगाल असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
दरम्यान, चंद्रपूरकरांवर पडणाऱ्या भरमसाठ मालमत्ता करवाढीचा विरोध दर्शविण्यासाठी आणि ती मागे घेण्यासाठी आपने ३ डिसेंबरला चंद्रपुरात एका मोर्चाचेही आयोजन केले आहे.
या संदर्भातील माहिती देण्यासाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सुनील मुसळे, अॅड. राजेश विराणी, माणिक सावरकर, सूर्यकांत चांदेकर, अशोक आनंदे, भीवराज सोनी आदींनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून महानगर पालिकेने दिलेल्या कंत्राटाच्या मंजुरीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ६ सप्टेंबर २०१४ च्या महानगर पालिकेच्या ठराव क्रमांक ७९ नुसार कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कंपनी प्रा. लिमी. या कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे कंत्राट दिले आहे. प्रत्यक्षात ही कंपनी १८ मार्च २०१४ रोजी पंजिबद्ध झालेली असताना मुल्यांकनाचे काम देण्यात आले आहे. या कंपनीचे भाग भांडवल फक्त पाच लाख रूपयांचे असतानाही ६ कोटी रूपयांच्या कामाचे कंत्राट महानगर पालिकेने कोणत्या आधारावर दिले, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
चंद्रपूर शहरात झोन क्रमांक एक मधील नागरिकांना या संदर्भात फेरमुल्यांकनाच्या नोटीस मनपाने बजावल्या असून नागरिकांनी या संदर्भात रोष व्यक्त केला आहे. दोन हजार १०० नागरिकांनी आपच्या आवाहनानुसार तक्रारी आणि आक्षेप दाखल केले असून हा प्रश्न आप आंदोलनाच्या माध्यमतून उचलणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवे कर लावण्याला आणि करवाढीला विरोध नाही, मात्र ही करवाढ अवाजवी असून मुल्यांकन योग्य न झाल्याच्या तक्रारी आहेत. एकाच स्वरूपाच्या मालमत्तेसाठी वेगवेगळे कर लावण्याचा प्रकार अनाकलनिय आहे. या कंपनीला कामाचा अनुभव नाही, तज्ज्ञ आणि अनुभवी कर्मचारी नाही, असे असतानाही कंपनीला कामाचे कंत्राट मिळावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
या कंपनीने कंत्राट मिळविताना बोगस कागदपत्रे सादर केली की मनपाने कागदपत्रे पहाताना डोळझाक केली याची शहानिशा व्हावी, अशीही मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)